चेन्नई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने आपण स्वतः ब्राम्हण असल्यामुळे चेन्नईची संस्कृती स्वीकारणे सोपे गेल्याचे वक्तव्य केल्याने त्याला सोशल मीडियावर अनेक युजर्सनी प्रचंड प्रमाणात ट्रोल करून त्याने जाहीर मागावी अशी मागणी केली आहे.
टीएनपीएल म्हणजेच तामीळनाडू प्रीमियर लीगचे समालोचन करण्यासाठी सुरेश रैनाला आमंत्रित केले होते. यातील पहिला सामना सोमवारी लायका कोवाई किंग्स आणि सालेम स्पार्टन्स यांच्यात झाला. या सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू असलेल्या रैनाला दुसऱ्या समालोचन करणाऱ्याने दाक्षिणात्य संस्कृतीजवळ जाणे तुला कसे शक्य झाले, असा प्रश्न विचारला. त्यावेळी रैना म्हणाला, ‘माझ्या मते मीही ब्राह्मण आहे. २००४ पासून मी चेन्नईमध्ये खेळत आहे. मला इथल्या संस्कृतीबद्दल प्रेम आहे. तसेच मला संघातील सहकारीही आवडतात. मी अनिरुद्ध श्रीकांत, सुब्रमण्यम बद्रीनाथ आणि लक्ष्मीपती बालाजी यांच्यासोबत खेळलो आहे. त्यांच्याकडून तुम्ही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे. आमच्या संघाचे प्रशासनही चांगले आहे. आम्हाला इथे स्वातंत्र्य आहे. तसेच चेन्नई सुपरकिंग्सच्या टीममध्ये असल्याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो. आम्ही तिकडे आणखी सामने खेळू’, अशी अपेक्षा असल्याचे रैनाने यावेळी सांगितले. यातील त्याने स्वतः ब्राम्हण असल्याचे सांगितल्याने अनेकांनी सोशल मीडियावर त्याच्यावर टीकास्त्र सोडले आहे.