रत्नागिरी- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी 25 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी दौरा केला होता. या रत्नागिरी दौर्यात त्यांनी शहरातील प्रसिद्ध पतित पावन मंदिराला भेट दिली. श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी बांधलेल्या पतितपावन मंदिराचा उल्लेख करण्याऐवजी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधलेल्या पतितपावन मंदिरात जावून पूजा केली, असा उल्लेख केला होता. यावरून रत्नागिरीकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चित्रा वाघ यांनी तातडीने माफी मागावी, असे रत्नागिरीकरांनी म्हटले आहे.
चित्रा आपल्या यांनी ट्विटमध्ये लिहिले की, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या प्रसिद्ध पतित पावन मंदिरात मनोभावे पूजा केली. प्रत्येक व्यक्तीला मंदिराच्या गाभार्यात जाऊन परमेश्वराला स्पर्श करून पूजा करण्याचा हक्क व अधिकार देणारे भारतातील पहिले मंदिर. त्यांच्या या ट्विटनंतर दानशूर भागोजीशेठ कीर यांचे कार्य डावलण्याचा, त्यांचा अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप भंडारी समाजाकडून करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, हा तर भागोजी शेठ कीर यांचे कार्य नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. भागोजीशेठ किर यांची 22 गुंठे जागा कोणी हडप केली? 13 गुंठे जागेत काय झाले? हे सर्व आम्हाला उघड करावे लागेल, असेही त्यांनी म्हटले. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा रत्नागिरीत फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.