मुंबई:- येत्या ४ फेब्रुवारीला पालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, ४ महिन्यांसाठी हंगामी अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी मांडावा. नगरसेवक पालिकेत आल्यानंतर अर्थसंकल्प योग्य पद्धतीने मांडणे योग्य राहील, असेही परब म्हणाले. पालिका आयुक्त आणि प्रशासकांनी आपल्या अधिकारांचा वापर हा गैरप्रकारासाठी करू नये असेही त्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा लोकांचा आहे, ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. त्यामुळे काही लोकांना समाधानी करण्यासाठी किंवा संतुष्ट करण्यासाठी प्रशासकांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये. मुंबईतील मेगा टिकिट, मेगा स्कॅमचा प्रकार हा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कागदोपत्री उघडकीस आणणार असेही ते म्हणाले. प्रशासकांच्या अधिकारात बेगलगाम पद्धतीने काम सुरू आहे. त्यामुळे नगरसेवक अस्तित्वात आल्यानंतर योग्य प्रक्रिया राबवत अर्थसंकल्प मांडणे योग्य असेल, असेही त्यांनी सांगितले.