नागपूर – विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रथम पसंतीचे उमेदवार आणि दलित नेते चंद्रकांत हंडोरे यांचा झालेला पराभव जिव्हारी लागला. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. निवडणूक मतदानात पक्षशिस्तीचा भंग झाला. त्यामुळे मनाला वेदना झाल्याने आपण राजीनामा दिला, असे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत हंडोरे पक्षाचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. दलित आणि वंचित समाजाचे नेते आहेत. त्यांचा पराभव काँग्रेसमधील अनेकांच्या जिव्हारी लागला. आंबेडकरी आणि दलित समाजामध्ये यामुळे संतापाची भावना आहे. हंडोरे काँग्रेसचे प्रथम पसंतीचे उमेदवार होते. पहिल्या पसंतीची मते त्यांना मिळायला हवी होती. पण ती मिळाली नाहीत. त्यांचा पराभव झाला. हंडोरे यांच्या समर्थनार्थ ऐक्यभाव म्हणून मी पदाचा राजीनामा देत आहे, असे गजभिये यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
