मुंबई – मुंबईतील वर्सोव्याच्या हिंदू स्मशानभूमीत आज दुपारी २ वाजता प्रसिद्ध गायक ‘कृष्णकुमार कुन्नथ’ उर्फ ‘केके’यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी 31 मे रोजी रात्री उशिरा कोलकाता येथे त्यांचे निधन झाले. ‘खुदा जाने’, ‘तू ही मेरी शब है’, ‘तडप-तडप के’, ‘यारों दोस्ती…’ अशी त्यांची अनेक गाणी रसिकांच्या ओठांवर असतात. अनेक वर्ष आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारे केके आज अखेर अनंतात विलीन झाले. केकेचा मुलगा नकुल यांनी केकेवर अंतिम संस्कार केले. केकेचा मृत्यू अनैसर्गिक असल्याची नोंद करण्यात आली होती. परंतू शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
केकेचे पार्थिव आज सकाळी एअर इंडियाच्या विमानाने कोलकात्याहून मुंबईत आणले गेले. सकाळी 10 ते 12:30 या वेळेत केकेचे पार्थिव वर्सोव्याच्या प्लार्क प्लाझामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. केकेचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक गायक आणि कलाकार उपस्थित होते. केकेच्या चाहत्यांनी त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. दुपारी 1 वाजता केकेचे पार्थिव पार्क प्लाझा येथून वर्सोवा स्मशानभूमीच्या दिशेने रवाना झाले. फुलांनी सजवलेल्या गाडीतील केकेचे पार्थिव स्मशानभूमीच्या दिशेने नेण्यात आले. वयाच्या 53व्या वर्षी केकेच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. केकेच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. केकेच्या निधनाची बातमी कळताच त्याची पत्नी ज्योती आणि मुलं तात्काळ कोलकाता येथे पोहोचले होते.
गायक अभिजीत भट्टाचार्य, जावेद अली, जावेद अख्तर, शंकर महादेवन, गायिका श्रेया घोषाल, अलका याज्ञी, आदी कलाकार लाडक्या केकेला शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ गायक ‘अभिजीत भट्टाचार्य’ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या मोठ्या ऑडिटोरिअममध्ये एक रुग्णवाहिका आणि मेडिकल सुविधा असणे गरजेचे आहे. जर या सुविधा तिथे उपलब्ध असत्या तर केकेला अस्वस्थ वाटत असताना त्याला हॉटेलला जावे लागले नसते. तो थेट रुग्णालयात गेला असता. दरम्यान, केके यांनी हिंदीशिवाय इतर अनेक भाषांतील गाण्यांना आवाज दिला. त्यांनी तेलुगू, तमीळ, कन्नड, मराठी, मल्याळम, बंगाली आणि गुजराती भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत. संपूर्ण कारकिर्दीत केके यांनी जवळपास २५ हजारपेक्षा अधिक गाणी गायली.