नवी दिल्ली- ‘हरिजन’ या शब्दाच्या जागी ‘डॉ. आंबेडकर’ या शब्दाचा वापर करण्याचा निर्णय दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने घेतला आहे. तसा अध्यादेश सरकारने काढला आहे. त्यामुळे आता हरिजन वस्ती/मोहल्ला ऐवजी डॉ. आंबेडकर वस्ती आणि मोहल्ला असे संबोधले जाणार आहे. यापूर्वी दिल्ली सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये डॉ. आंबेडकर आणि भगत सिंग यांचे फोटो लावण्याचा आदेश काढला होता. दिल्ली महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केजरीवालांनी हा निर्णय घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दिल्लीनंतर पंजाबमध्ये सरकार स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाला विस्ताराचे वेध लागले आहेत. दिल्ली महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. दिल्लीत १६.७५ टक्के दलित आहेत. त्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी केजरीवाल यांनी हरिजनऐवजी डॉ. आंबेडकर या शब्दप्रयोगाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची अधिसूचना काढली आहे. दलित आणि पंजाबी मते मिळाल्यास दिल्ली महापालिका सहज जिंकता येऊ शकते, असे गणित केजरीवालांचे यामागे आहे. यापूर्वी त्यांनी सरकारी कार्यालयांमध्ये डॉ. आंबेडकर आणि भगत सिंग यांचे फोटो लावण्याचा आदेश दिला होता. केजरीवाल सध्या निळ्या शर्टमध्ये वावरताना दिसतात. राजकारणाचा हा भाग असल्याचे राजकीय जाणकार मानतात.