हातकणंगले – कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी- सांगली रोडवर असलेल्या मोजे खोतवाडी येथे श्री गजानन महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे.या मंदिराला आता क वर्ग ऐवजी ‘ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.आमदार प्रकाश आवाडे यांनी सरकारदरबारी सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर त्यांच्या या मागणीला यश आले आहे.राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव का.गो.वळवी यांनी यासंदर्भातील अध्यादेश नुकताच जारी केला आहे.या निर्णयामुळे खोतवाडीसह तमाम भक्तवर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
हे श्री गजानन महाराज मंदिर महाराष्ट्रासह सीमा भागातील भक्तगणांचे श्रद्धास्थान बनले आहे. दररोज हे भाविकांनी गजबलेले दिसून येते.या मंदिराला ‘क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आधीपासुन होता.मात्र भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे या मंदिर परिसराचा विकास होणे गरजेचे होते. त्यामुळे या मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रयत्न सुरू केले होते.त्यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आली होती.अखेर आमदार आवाडे यांनी त्यासाठी प्रयत्नाचे सातत्य ठेवल्याने हे यश प्राप्त झाले आहे.आता या मंदिराला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ‘ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यत आला.