मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेले अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही या समाजाला आरक्षण मिळालं नसल्याने खासदार संभाजी भोसले आक्रमक झाले आहेत. त्यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला आहे. तसेच, मराठा आरक्षणासंदर्भात आणि मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारनं उपाययोजनांची ब्लू प्रिंट द्यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे आरक्षण प्रकरण प्रलंबित आहे. मात्र, अद्यापही त्यावर ठोस पावलं उचलली गेली नाहीत. त्यामुळे संतापलेल्या मराठा बांधवांनी आता उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. उपोषणाला बसताना संभाजी भोसले म्हणाले की, ‘हा लढा ३० टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी आहे. त्यांच्या आरक्षणासोबत इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आहे.’
ते पुढे म्हणाले की, “मी २००७ पासून महाराष्ट्र फिरतोय. मी आजच टपकलो नहीये. मी शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने महाराष्ट्र पिंजून काढला. यातून आम्ही आरक्षण समाजाला का गरजेचं आहे याची जनजागृती केली होती. २०१३ ला मी महाराष्ट्रात फिरत असताना मराठा समाजाच्या संघटनांनी एकत्र येऊन सांगितलं की राजे तुम्ही नेतृत्व करणं गरजें आहे. त्यामुळेच २०१३ला आझाज मैदानात आम्ही मोर्चा काढला होता. त्यानंतर नारायण राणे समिती स्थापन झाली.”
मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र मागासवर्ग आयोगाची घोषणा शुक्रवारी केली. यासंदर्भात विचारणा केली असता संभाजीराजे भोसले यांनी त्यावर निशाणा साधला. “एक मागासवर्ग आयोग असताना फक्त मराठा समाजासाठी वेगळा आयोग तयार करता येतो का? हा प्रश्न आहे. फक्त मराठा समाजाला खूश करण्यासाठी असं वक्तव्य येता कामा नये. माझ्या माहितीनुसार हे कायदेशीर नाही”, असं ते म्हणाले. “तुम्ही या अर्थसंकल्पात आमच्या मागण्यांसदर्भात तरतूद करा. ब्लू प्रिंट दाखवा. आर्थिक नियोजन सांगा. तुमच्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्या करा”, असं देखील ते म्हणाले.