वर्धा – दोन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे पीडितेच्या दुसऱ्या स्मृती दिनादिवशी हा निकाल लागल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.
पीडितेचे वकील ऍड. उज्ज्वल निकम म्हणाले की, आरोपी विकेश नगराळे याला मृत्यूदंड द्यावा अशी शिक्षेची मागणी आम्ही केली होती. आरोपीचाही युक्तिवाद यावेळी झाला. आरोपीतर्फे सांगण्यात आले की, त्याचे लग्न झाले आहे त्याला दया दाखवावी. या उलट आरोपीला कठोर शासन खुनाच्या आरोपात जे दिलं जाऊ शकतं, त्यात आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी आम्ही न्यायालयात केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांचे म्हणणे ऐकून घेत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
काय आहे प्रकरण?
वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली अंकिता 3 फेब्रुवारीला 2020 ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जातांना आरोपी विकेश नगराळे दबा धरून बसला होता. प्राध्यापिका दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील पेट्रोल काढलेली पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवून टाकले. यात गंभीररित्या भाजलेल्या पीडितेवर नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.
आरोपीविरुद्ध 426 पानांचे दोषारोप
या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होती. या प्रकरणात महिला तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 19 दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. शिवाय, 28 फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
10 फेब्रुवारीला उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शासनाने उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. या प्रकरणात 29 साक्षीदार तपासण्यात आले होते. घटनेपासून आरोपी विकेश नगराळे कारागृहात होता, आता त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.