नागपूर – विद्यार्थ्यांना चिथावणी देऊन आंदोलनासाठी भडकावल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या आणि नुकताच जामीन मिळालेल्या हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठकच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता त्याला नागपूर पोलिसांनी नोटीस बजावली असून २२ फेब्रुवारीला पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
हिंदुस्तानी भाऊ विकास पाठकने ३० जानेवारीला इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याने आपल्या चाहत्यांना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराचा पत्ता सांगितला होता. एवढेच नाही तर वेळ आणि किती वाजेपर्यंत आंदोलन करायचे याचीही सूचना दिली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घराबाहेर आंदोलन केले. विशेष म्हणजे त्यांनी या आंदोलनाची पूर्वसूचना दिली नव्हती. पोलिसांची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊला विद्यार्थ्यांना भडकाविल्याच्या आरोपाखाली धारावी ठाण्याच्या पोलिसांनी १ फेब्रुवारीला अटक केली होती. तेव्हापासून अटकेत असलेल्या हिंदुस्थानी भाऊला १७ फेब्रुवारीला जामीन मंजूर झाला. त्यानंतर लगेच नागपूर पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे. नागपूरमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या प्रकरणी नागपूरमध्येही हिंदुस्तानी भाऊ विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी २२ फेब्रुवारीला त्याला पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश नागपूर पोलिसांनी दिला आहे. पुणे आणि बीडमध्ये ही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या सर्व आंदोलनांच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.