- ६०.४ कोटींला सिंगापूर कंपनी खरेदी करणार
मुंबई – भारतातील हिंदुस्थान लिवर या कंपनीचे मालकीचे अन्नपूर्णा आटा आणि कॅप्टन कूक मीठ हे दोन ब्रँड सिंगापूरची एक कंपनी विकत घेणार आहे.या दोन्ही ब्रँडचा ६०.४ कोटी रुपयांत सौदा झाला आहे.त्यामुळे आता हे दोन्ही ब्रँड पुन्हा नव्या रूपात भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
सिंगापूर येथील रिअॅक्टिव्ह ब्रॅण्ड्स इंटरनॅशनल या कंपनीने अन्नपूर्णा आणि कॅप्टन कूक हे दोन ब्रँड विकत घेतले आहेत. हिंदुस्थान लिवर आपल्या या दोन्ही ब्रॅण्ड्सचे ट्रेडमार्क आणि कॉपीराईट हक्क हस्तांतरित करणार आहे. भारतीय बाजार आणि अन्य ठिकाणचे सर्व अधिकार सिंगापूरच्या कंपनीला मिळणार आहेत. वास्तविकता,अजून हा खरेदी सौदा पूर्ण झालेला नाही.मात्र पुढील तीन महिन्यांत तो पूर्ण होऊन या ब्रँडची पूर्ण मालकी सिंगापूरच्या रिअॅक्टिव्ह ब्रॅण्ड्स इंटरनॅशनल कंपनी जाईल.हे दोन्ही ब्रॅण्ड्स २० वर्षे जुने आहेत.बाजारात त्यांची चलती आहे.पण आणखी नाव कमवण्यासाठी त्याची विक्री करावी लागली असल्याचे हिंदुस्थान लिवरचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी सांगितले.या दोन्ही ब्रॅण्ड्सचा भारतातील कारभार उमा ग्लोबल फूडस आणि उमा कंझ्युमर प्रॉडक्टकडे राहणार आहे.या दोन्ही ब्रॅण्ड्सनी २०२१-२०२२ मध्ये १२७ कोटींचा व्यवसाय केला आहे