संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

हिजाबनंतर आता नमाज पठणवाद सुरू! व्हायरल व्हिडिओने खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बंगळुरू – कर्नाटकाच्या महाविद्यालयात हिजाबवरून निर्माण झालेला वाद कायम आहे. असे असतानाच दक्षिण कन्नड आणि बागलकोट या जिल्ह्यांतील दोन प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी वर्गात नमाज पठण करत असल्याचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. शुक्रवारी हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातील एक दक्षिण कन्नडच्या अंकथडका येथील सरकारी प्राथमिक विद्यालयातील आणि दुसरा बागलकोटच्या मौलाना अबुल कलाम आझाद शाळेतील आहे. त्यामुळे पुन्हा खळबळ माजली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने हा वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यात दक्षिण कन्नडमधील वादावर तोडगा निघाला, अशी माहिती कर्नाटकच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील एका महाविद्यालयात हिजाबवरून वाद निर्माण झाला. त्याचे पडसाद महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर काही राज्यांच्या काही भागात उमटले. कॉलेजमध्ये निर्माण झालेल्या या वादाचे पडसाद संपूर्ण कर्नाटकात उमटले. तेव्हा हा वाद आणखी चिघळू नये म्हणून तेथील शाळा, कॉलेजांना सरकारने सुट्टी जाहीर केली. असे असताना आणि हा वाद मिटला नसताना दक्षिण कन्नडमधील सरकारी प्राथमिक शाळेत आणि बागलकोटच्या मौलाना अबुल कलाम आझाद स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी वर्गात नमाज अदा केल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर कर्नाटक प्रशासनाने शनिवारी दक्षिण कन्नडच्या शाळेत विद्यार्थी, पालक, सरकारी अधिकारी आणि शिक्षकांची बैठक घेतली. त्यात शाळेत कोणतेही धार्मिक कार्य किंवा कार्यक्रम केले जाणार नाहीत. तसेच यापुढे पुन्हा असा प्रकार घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळेत यापुढे असा प्रकार घडणार नाही, असे शाळेच्या मुख्याध्यापिका जलजा यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. शांतता पाळावी, पालकांनी एकजूट राखावी यावर बैठकीत एकमत झाले, असे शिक्षणाधिकारी लोकेश यांनी सांगितले. दक्षिण कन्नडच्या शाळेतील वाद मिटला असला तरी बागलकोट प्रकरणावर तोडगा निघालेला नाही. तेथील मौलाना अबुल कलाम आझाद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची परवानगी न घेता शुक्रवारी दुपारी जेवणाच्या सुट्टीत वर्गात नमाज अदा केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, असे शिक्षण उपसंचालक श्रीशैल बिरदार यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami