संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

हिजाबप्रकरणाचे पडसाद भिवंडीत, हजारो महिलांनी राबवली स्वाक्षरी मोहीम

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बंगळुरू – कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण अत्यंत तापलेलं आहे. कर्नाटकातील हे प्रकरणाचे पडसाद आता इतर राज्यातही जाणवू लागले असून मदनपुरा आणि भिवंडीत यासाठी स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली.

“आजची मोहीम हिजाब घालण्याच्या त्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कर्नाटकातील मुलींना आमचा पाठिंबा दर्शवण्यासाठी घेण्यात आला होती. हिजाब घालणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या या अनावश्यक वादामुळे आम्ही दुखावलो आहोत,” असे समाजवादी पक्षाचे दक्षिण मुंबई क्षेत्र प्रमुख सोहेल खान म्हणाले.

या मुलींना पाठिंबा देण्यासाठी हिजाब परिधान केलेल्या महिला मोठ्या संख्येने मदनपुरा येथे जमल्या आणि हिजाब परिधान करण्याच्या समर्थनार्थ त्यांनी आवाज उठवला. मंगळवारी घटनास्थळी जमलेल्या ५०० हून अधिक महिलांनी मोहिमेत स्वाक्षऱ्या करून घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हा प्रकार उडुपी येथील सरकारी मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयात घडला. सहा विद्यार्थिनींनी ड्रेस कोडचे उल्लंघन करून हिजाब घालून वर्गात हजेरी लावली होती. महाविद्यालयाने वर्गाव्यतिरिक्त इतरत्र हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami