श्रीनगर – देशात सुरू असलेल्या हिजाब आणि भगवाच्या वादावरून व्यथित झालेल्या काश्मीरमधील केरळच्या शहीद जवानाने देशवासियांसाठी शेवटचा संदेश दिला आहे. हिजाब आणि भगवा यावरून भांडू नका. अशा गोष्टी आम्ही पाहतो तेव्हा अतिशय दुःख होते, असे अल्ताफ अहमद या जवानाने मोबाईलवरील व्हाईस मेसेजमध्ये म्हटले आहे. बुधवारी काश्मीरमध्ये हिमस्खलन झाले. त्यात अल्ताफला वीर मरण आले. त्यानंतर त्याचा हा व्हाईस मेसेज शुक्रवारी लष्कराच्या जवानांनी माध्यमांकडे दिला.
केरळचे अल्ताफ अहमद भारतीय लष्करात हवालदार होते. १९ वर्षांपासून देशसेवा करणारे अल्ताफ काश्मीरमध्ये तैनात होते. बुधवारी तेथे हिमस्खलन झाले. त्यात त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यापूर्वी त्यांनी लष्करातील मित्रांना मोबाईलवर देशवासियांसाठी शेवटचा व्हाईस संदेश पाठवला होता. त्यात ते म्हणतात की, तुम्ही सगळे चांगले रहा. धर्म आणि जातीच्या नावावर भांडू नका. आम्ही सैनिक सीमेवर देशाची सेवा करतो आहोत. प्राणाची बाजी लावत आहोत. आपण चांगले आणि सुरक्षित रहावे यासाठी आम्ही हे सारे करतो आहोत. आपण देशाचा विचार करावा. मुलांनाही तशी शिकवण द्यावी. हिजाब आणि भगवा यावरून भांडू नका. अशा गोष्टी पाहून आम्हाला दुःख होते. कर्तव्य बजावत असताना देशातील सारे लोक चांगले आहेत व आपण भारतमातेचे सुपुत्र आहोत, असे आम्ही मानतो. तेव्हा कृपया आमचे बलिदान वाया घालवू नका. आपल्यासाठी प्राणांचे बलिदान देताना अनेक जवान आम्ही सीमेवर पाहतो, असे त्यांनी या व्हॉइस संदेशात म्हटले आहे.