बंगळुर : कर्नाटकातील हिजाबचा वाद अजून संपलेला नाही. त्यात कर्नाटकमध्ये विद्यापीठपूर्व परीक्षा ९ मार्चपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे आता येथील काही विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या परीक्षेला हिजाब घालून बसण्याची परवानगी मागितली आहे. या प्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
कर्नाटकात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हिजाब परिधान केलेल्या मुलींना परीक्षेला बसू दिले जात नाही. मात्र आता सुरु होणाऱ्या परीक्षांसाठी या मुलींना हिजाब घालण्यास परवानगी द्यावी असे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाकडे वकील शादान फरासत यांनी मागणी केली आहे.
यावर सीजेआय यांनी त्यांना परीक्षा देण्यापासून कोण रोखत आहे, असे विचारले असता, वकील शादान फरासत म्हणाले की, हिजाब परिधान करणाऱ्या विद्यार्थिनींना परीक्षेला बसू दिले जात नाही. ९ मार्चपासून परीक्षा सुरू होत आहे. पण या विद्यार्थिनी हिजाबशिवाय परीक्षा देण्यास तयार नाहीत. हे विद्यार्थी परीक्षेला बसले नाहीत तर त्यांचे वर्ष वाया जाईल. त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी. या प्रकरणी वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर याचिकेवर विचार केला जाईल असे सर्वोच्च न्य्याल्याने बुधवारी सांगितले. याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हिजाब बंदी प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. मात्र, सुनावणीदरम्यान दोन न्यायाधीशांच्या खंडपीठात एकमत होऊ शकले नाही.