कॅलिफोर्निया- अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याला हिमवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. या हिमवादळात ९ नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियातील १३ शहरांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या वादळात १०० पेक्षा जास्त नागरिकांचा बचाव करण्यात आला आहे.
कॅलिफोर्नियाच्या अनेक भागात बर्फवृष्टी सुरू असून ७० हजारपेक्षा जास्त नागरिकांच्या घरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. पुढील काही दिवसांत १८ ते २४ इंचापर्यंत बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दुसरीकडे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान झालेल्या हिमवर्षांवामुळे आणि विक्रमी पावसामुळे दुष्काळी समस्या मात्र मिटली आहे. अमेरिकेने जारी केलेल्या दुष्काळाबाबतच्या नकाशामध्ये १७ टक्के भागांत दुष्काळाची परिस्थिती नसल्याचे दर्शविले आहे.