कुल्लू – हिमाचल प्रदेशात काल रात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने लोक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचे केंद्र चंबा जिल्ह्यातील चुरा येथे होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी होती. याआधी १६ नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मंडी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते.त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी होती.तर भूकंपाचे केंद्र मंडीचे जोगिंदर नगर होते.या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
काल रात्री झालेल्या भूकंपाचा परिणाम चंबा जिल्ह्यातील आसपासच्या भागातही दिसून आला. भूकंपाची खोली 5 किमी होती. त्यामुळे मध्यरात्री गाढ झोपेतून चंबातील अनेक भागातील लोक जागे होऊन अनेक ठिकाणी लोके घराबाहेर पडले. हिमाचल प्रदेशसह हिमालयीन भागात भूकंपाचे धक्के काही दिवसांपासून जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये किन्नौर आणि इतर जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. हिमाचल प्रदेश हे भूकंपप्रवण क्षेत्र चार आणि पाचमध्ये येते. कांगडा, चंबा, लाहौल, कुल्लू आणि मंडी हे भूकंपप्रवण क्षेत्र आहेत.