हैदराबाद : बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोणशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये सुरू असलेल्या शूटिंगदरम्यान अचानक हृदयाचे ठोके वाढल्याने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाला हैदराबादच्या कमिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला असून, सध्या दीपिका तिच्या हॉटेल नोवोटेल हैदराबादमध्ये परतली असल्याची माहिती आहे. दरम्यान, हैदराबादमध्ये दीपिका पदुकोण तिच्या ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती. शूटिंगदरम्यान दीपिकाने हृदयाचे ठोके वाढल्याची तक्रार केल्यांनतर ताबडतोब तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हैदराबादच्या कामिनेनी हॉस्पिटलमध्ये तिची तपासणी करण्यात आली असून, सध्या ती हॉटेलमध्ये आराम करत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत दीपिका किंवा दीपिकाच्या पीआर टीमकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका सध्या विश्रांती घेत असून, आता तिची प्रकृती सुधारल्याचे म्हटले जात आहे.