संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

#हेल्दीMe : थायरॉईड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

जर तुमचं वजन काही दिवसांमध्ये खूप झपाट्यानं वाढत किंवा कमी होत असेल, कामात मन लागत नसेल, नैराश्य येत असेल ,तुमची अकारण चिडचिड होत असेल, त्वचा कोरडी झाली असेल, केस गळत असतील , शरीराच्या विविध भागांत मंद-मंद दुखत असेल तर ही सर्व लक्षणं थायरॉइड डिसऑर्डरची असू शकतात.

मासिक पाळी, गर्भ धारणा , प्रसूती याशिवाय घर आणि कामाच्या ठिकाणी असलेले ताणतणाव यामुळे जगभरातील महिलांमध्ये थायरॉईड ही जणू काय सर्वसामान्य गोष्ट बनलीय.२५ मे रोजी जागतिक थायरॉइड दिवस साजरा करण्यात येतो. थायरॉईडच्या १०० रुग्णांमध्ये ८० रुग्ण या महिला असतात, त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत या विकाराने ग्रस्त महिलांची संख्या जास्त आहे. असं एका अध्ययनातून समोर आलंय.

हा आजार ३० वर्षांवरील महिलांमध्ये जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. काहीमध्ये यापेक्षा कमी वयाच्या स्त्रियांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. ६०च्या वयापर्यंत प्रत्येक पाच पैकी एका महिलेला थायरॉइडची समस्या असते. गर्भवती महिला जर थायरॉईड विकाराने ग्रस्त असेल तर तिच्या बाळालाही थायरॉईड होऊ शकतो.

थायरॉइड म्हणजे नेमके काय आहे?

थायरॉईड हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ ‘ संरक्षण ‘ असा आहे. थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती गळ्याच्या जागी समोरच्या बाजूस स्वर यंत्राखाली स्थित असते. ती आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाची ग्रंथी असून शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे हे तिचे मुख्य कार्य आहे.

थायरॉइड ग्रंथी कसे काम करते?

चयापचय नियंत्रणात ठेवण्यासाठी, थायरॉईड संप्रेरकांचं उत्पादन करते आणि शरीराच्या गरजेनुसार त्यांचे उत्सर्जनही करते. ही संप्रेरके शरीरातील पेशींना किती ऊर्जा वापरायची ते सांगत असतात. रक्तातील थायरॉईड संप्रेरकांचं प्रमाण हे पोषग्रंथिव्दारे (पिट्युटरी ग्रंथी) केले जाते. मेंदूच्या खालच्या भागात कवटीच्या मध्यभागी स्थित असलेल्या ह्या पोषग्रंथीला जेव्हा अतिप्रमाणातील किंवा कमी प्रमाणातील थायरॉईड संप्रेरकांची जाणीव होते, तेव्हा ती आपला संप्रेरक (टीएसएच) कमीजास्त करते आणि तो थायरॉईडला पाठवून तिला काय करायचे ते सांगते.

नेमकं काय होतं?

थायरॉइड ग्रंथी आयोडीनचा वापर करून thyroxin (T4) नामक संप्रेरक तयार करते. T4 रक्ताद्वारे शरीरातील पेशींमध्ये जाऊन Triiodothyronine (T3) तयार करते. या ग्रंथीच्या कार्याचे नियंत्रण इतर ग्रंथीप्रमाणे अर्थातच मेंदूमधील Hypothalamus व Pituitary gland द्वारे होते. T3 व T4 यांचे कमी किंवा जास्त प्रमाण नियंत्रित करण्यासाठी Pituitary Gland द्वारे Thyroid Stimulating Harmone (TSH) चा स्त्राव करते. TSH पुढे थायरॉइड ग्रंथीमध्ये जाऊन T4 व नंतर T3 चा स्त्रवन करते.

कारणे

▪अनुवांशिकता
▪बदलती जीवनशैली व वातावरण
▪लिंग – जास्त प्रमाणात स्त्रिया, गर्भवती महिला व लहान मुले
▪ रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे
▪असंतुलित आहार
▪आहारात कमी किंवा जास्त प्रमाणात आयोडीनचा वापर करणे
▪फ्लोराइडयुक
आहाराचे जास्त प्रमाणात सेवन करणे
▪मानसिक ताणतणाव
▪व्यायामाचा अभाव
▪थायरॉईड ग्रंथींचे जंतुसंसर्ग
▪तंबाखू,मद्य इत्यादींचे सेवन
▪काही औषधांचा दुष्परिणाम स्वरूपात
▪काही आजारांच्या दुष्परिणाम स्वरूपात, मधुमेह
▪मेंदू ,यकृत, आतडे अशा अवयवांच्या दोषांमुळे

या व अश्या अनेक कारणांमुळे थायरॉईड होऊ शकतो.

थायरॉइडचे आजार किती प्रकारचे आहेत?

साधारण पाच प्रकारचे थायरॉइडचे आजार आहेत.

  1. हायपोथायरॉईडझम
  2. हायपरथायरॉईडझम
  3. GOITER
  4. HASHIMOTO’S THYROIDITIS (THYROID NODULES)
  5. थायरॉईड कॅन्सर

हायपोथायरॉईडझम हा आजार सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळतो. यामध्ये थायरॉइड ग्रंथी गरजेपेक्षा कमी प्रमाणात संप्रेरके निर्माण करते. याला अंतर्गत सक्रिय थायरॉईड असेही म्हणतात. या रुग्णांमध्ये TSH वाढलेले असते. थायरॉईड ग्रंथीे, pituitary gland किंवा Hypothalamus यापैकी कोणत्याही यंत्रणेतील बिघाडामुळे हा आजार होऊ शकतो. या आजारात शरीराची चयापचय क्रिया हळू होते म्हणून या रुग्णांमध्ये वजन झपाट्याने वाढते.

लक्षणे –

▪वजन वाढणे
▪थकवा
▪स्मरणशक्ती कमी होणे
▪त्वचा रूक्ष होणे
▪नखे तुटणे
▪अपचन, बद्धकोष्ठ इ.
▪शरीराचे तापमान वाढणे
▪शरीरावर सूज
▪अंगदुखी ,सांधेदुखी
▪नैराश्य, चिडचिड
▪हृदयाचे ठोके वाढणे
▪मासिक पाळीचा स्त्राव खूप प्रमाणात व बऱ्याच दिवस होणे
▪डोळे मोठे होणे व बाहेर येणे
▪केस गळणे
▪हाता पायांमध्ये मुंग्या येणे

या प्रकारची लक्षणे आढळतात.

हायपरथायरॉईडझम या प्रकारामध्ये थायरॉईड संप्रेरकांची निर्मिती जास्त प्रमाणात होते. याला अतिक्रियाशील थायरॉईड असेही म्हणतात. या रुग्णांमध्ये TSH कमी होते. यात चयापचय क्रिया वाढलेली असल्यामुळे सुरुवातीच्या काळात रुग्णास फारसा त्रास जाणवत नाही त्यामुळेच या रुग्णांचे लवकर निदान होणे अवघड असते.

लक्षणे –


▪थकवा
▪ विनाकारण वजन कमी होणे
▪नैराश्य ,निद्रानाश
▪ हृदयाचे ठोके वाढणे
▪स्मरणशक्ती कमी होणे
▪खूप घाम येणे, उष्णता सहन न होणे
▪दृष्टी कमी होणे
▪मासिक पाळीत अत्यल्प स्त्राव
▪अतिसार

Goiter या प्रकारात थायरॉइड ग्रंथीची वाढ झालेली दिसते. गळ्यावर गाठ येणे हे प्रमुख लक्षण असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही व्याधी उद्भवते.

HASHIMOTO’S THYROIDITIS (THYROID NODULES) या प्रकारात थायरॉइड ग्रंथींमध्ये एक किंवा अनेक गाठी निर्माण होतात. त्या ग्रंथी मोठ्या प्रमाणात वाढल्यावर थायरॉइड ग्रंथीच्या आजूबाजूच्या अवयवांवर पडणाऱ्या ताणामुळे वारंवार आवाज बसणे, घसा दुखणे, गिळताना त्रास होणे असे त्रास होतात. या प्रकारातही गळ्याला सूज येते.

थायरॉईड कॅन्सर –
प्रौढ स्त्रियांमध्ये ६% तर पुरुषांमध्ये फक्त २% प्रमाणात थायरॉईड कॅन्सरचे रुग्ण आढलून येतात. थायरॉईड गाठींपैकी( nodules) पैकी फक्त ५% गाठी ह्या कॅन्सरच्या असतात.
इतर कॅन्सरच्या प्रकारापेक्षा या कॅन्सरचे निदान लवकर होत असल्याने मृत्यूचे प्रमाणही कमी आहे.

निदान –
थायरॉइडचा आजार ओळखण्यासाठी खालील तपासण्या उपलब्ध आहेत. पण ह्या तपासण्या आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कराव्यात.

तपासण्या –
▪Thyroid profile (T3, T4, TSH or Free T3, Free T4, Free TSH)
▪Thyroid Antibodies Test
▪Ultrasound
▪Thyroid scan
▪Fine needle Aspiration
▪Biopsy

उपचार –
काही थायरॉइडचे आजार औषधौपचाराने बरे होतात तर काहीमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. थायरॉइडचे उपचार व्यवस्थित न घेतल्याने व थायरॉइड अनियंत्रित असेल तर त्याचे बरेच दुष्परिणाम शरीरावर होतात.
कोलेस्टेरॉल वाढणे, PCOD, मधुमेह, व्हिटॅमिन डी ची कमतरता , हृदयविकार असे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे थायरॉईडची लक्षणे जाणवू लागल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
जीवनशैलीतील सकारात्मक बदल, संतुलित आहार ,नियमित व्यायाम व योग्य वैद्यकीय उपचार याने हा आजार नक्कीच नियंत्रित अथवा बरा होऊ शकतो.

योग व प्राणायाम हायपोथायरॉईडझममध्ये खालील योगासने व प्राणायाम करावा:

आसने
१. सर्वांगासन
२. अधोमुख आसन
३. जानू शीर्षासन
४. मत्स्यासन
५. हलासन
६. मार्जरासान
७. वेगाने सूर्य नमस्कार करणे.
प्राणायाम
१. कपाल भाती
२. नाडी शोधन
३. भस्त्रिका
४. उज्जयी प्राणायाम.
यासारखे उष्ण प्राणायाम प्रभावी ठरतात.

हायपरथायरॉईडझमसाठी खालील योगासने व प्राणायाम करावेत

आसने
१. सेतूबंधासन
२. मार्जरासान
३. शिशु आसन
४. शवासन
५. मंदगतीने केलेले सूर्य नमस्कार आणि त्याच्या जोडीला मंत्रोच्चार.

प्राणायाम
१. उज्जयी
२. भ्रामरी
३. अनुलोम विलोम
४. शीतली
५. सितकारी
यासारखे थंडावा देणारे प्राणायाम उपयुक्त ठरतात.
हायपो आणि हायपरथायरॉईडझम यांमध्ये रोज काही मिनिटे ध्यानधारणा करावी.

थायरॉईड विकाराने ग्रस्त लोकांनी पाळावयाचे आहारविषयक नियम

थायरॉइडची अनेक लक्षणं पोषक पदार्थांच्या सेवनानं दूर होऊ शकतात.या आजारात महिलांमध्ये विशेषत: आयर्नची कमतरता भासते.अशा वेळी त्यांना आयर्नसोबतच इतर पोषक पदार्थही मोठ्या प्रमाणात घ्यायला हवेत. स्वस्थ राहण्यासाठी संतुलित भोजन जरूर करा.

काय खावे?

१. आहारामध्ये अधिक तंतुमय पदार्थांचा समावेश करा.
२. चरबी आणि कर्बोदके खाणे कमी करा.
३. ताजी फळे आणि हिरव्या भाज्या जास्तीत जास्त खा.
४. लसूण, तीळ, मशरूम खाणं पण थायरॉइडच्या रुग्णांसाठी फायदशीर ठरते.
५. खाण्यात प्रोटीनचं प्रमाण वाढवा कारण
शरीरात प्रोटीनच थायरॉईड हार्मोन्सला ढकलून टिश्यूजपर्यंत पोहचवतात.

काय खाऊ नये?

१. कॅफीनचे प्रमाण एकदम कमी करा.
२. मांसाहारी पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ (मलईरहित दूध घेणे योग्य राहील), भात, मसालेदार पदार्थ, फास्ट फूड आणि preservatives वापरलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खा.
३. साखर व शरीरात साखरेचं प्रमाण वाढवणारे पदार्थ कमी खा.
डॉक्टर्स थायरॉइडच्या रुग्णांना दररोज काही वेळ कोवळ्या उन्हात बसण्याचा सल्ला देतात.

  • – अश्विनी मेढी-घाटपांडे
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami