मुंबई- दहावी- बारावी परीक्षेबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली. माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या लक्षात आल्याने हा नवीन नियम लागू करण्यात आला.
यावर्षी २१ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत दहावी -बारावीच्या लेखी परीक्षा होणार आहेत. सकाळच्या सत्रात ११ आणि दुपारी ३ अशी परीक्षेची वेळ असेल. आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत १० मिनिटे उशीर झाला तरीही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास परवानगी मिळत होती. मात्र,आता राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सकाळी १०:३० तर दुपारी २:३० वाजेपर्यंत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या संदर्भातील पत्रक मंडळाकडून सर्व शाळांना पाठवण्यात आले.