पालघर – चिकू फळाचे उत्पादन आणि त्यापासून तयार होणार्या विविध खाद्यपदार्थांना चालना देण्यासाठी जिल्ह्यातील बोर्डी येथे दोन वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच
चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.समुद्र किनारी १८ व १९ फेब्रुवारी असे दोन दिवस हा महोत्सव रंगणार असून यात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
विशेष म्हणजे यंदा या महोत्सवात ‘चिकू पॅव्हेलियन ‘असा विशेष कट्टा उभारला जाणार आहे.यंदा या महोत्सवाचे नववे वर्ष आहे. रूरल एंटरप्रेनर वेल्फेअर फाउंडेशन,विविध स्थानिक संस्थांच्या सहकार्याने हा चिकू महोत्सव पार पडणार आहे.कोरोना निर्बंध लावल्याने दोन वर्षे यात खंड पडला होता.मात्र यंदा या महोत्सवात ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ या थीमवर फेस्टिवलमधील सजावट केली जाणार आहे. यामध्ये स्थानिक उत्पादने, कलाविष्कार यांना ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर उपक्रमांवर प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच स्थानिय शेतकरी व बागातदारांसाठी कृषी प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आदिवासी चित्रकला, मातीची भांडी बनवणे, टोपल्या व नारळाच्या झावळ्या विणणे, हस्तकला, व्यंगचित्र बनवणे इत्यादी कार्यशाळांचा समावेश आहे. या महोत्सवात कलागुणांना वाव देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असून लहान मुलांसाठी पपेट शो, मेट्रो मॅजिक व इतर कार्यक्रमांचा समावेश आहे. या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटावा, असे आवाहन महोत्सवाच्या जनसंपर्क अधिकारी दीप्ती राऊत यांनी केले.
दरम्यान,स्थानिक खाद्यसंस्कृतीला चालना देणारे शाकाहारी आणि मांसाहारी असे विविध प्रकारचे खाद्य पदार्थ असेल स्टॉल लावले जाणार आहेत.
तसेच चिकू फळ व त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व प्रदर्शनासाठी ‘चिकू पॅवेलियन’ असा विशेष कट्टा थाटण्यात येणार असून त्यामध्ये किमान १५ बागायतदार, चिकू पदार्थांचे उत्पादन करणारे गृह उद्योग व महिला उद्योगांना स्थान देण्यात येणार आहे.