यूजीन – आज ओरेगनमधील यूजीन येथे अठराव्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. यात भारतीय स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. पुरुष गटाच्या अंतिम फेरीत चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब भालाफेक करून त्याने रौप्यपदकावर नाव कोरले. विशेष म्हणजे २००३ मधील लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जच्या कांस्यपदकानंतर जागतिक चॅम्पियनशिपमधील भारताचे हे एकमेव दुसरे पदक आहे.
नीरजने आजच्या स्पर्धेत पहिल्या प्रयत्नात संपूर्ण ताकदीने भाला फेकला होता, मात्र तो फाऊल ठरला. मग दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८२.३९ मीटर लांब भाला फेकला, त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात ८६.३७ मीटर लांब भाला फेकला आणि चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. परंतु सुवर्णपदकाचे त्याचे स्वप्न मात्र थोड्या फरकाने हुकले. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सनने सुवर्णपदक पटकावले. त्याने तब्बल ९०.५४ मीटर अंतरावर भाला फेकला. तर, चेक रिपब्लिकच्या जेकब वाड्लेचने ८८.०९ मीटर अंतरावर भाला फेकून कांस्यपदक पटकावले.
दरम्यान, मागील वर्षी झालेल्या या स्पर्धेत नीरज कोपराच्या शस्त्रक्रियेमुळे खेळू शकला नव्हता, तर त्याआधीच्या मौसमात तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नव्हता. यंदाच्या चॅम्पियनशिपमध्ये नीरजव्यतिरिक्त इतर ३४ खेळाडू सहभागी झाले होते. सर्वांना दोन गटात विभागण्यात आले होते. नीरज हा पहिल्या गटात होता. या चॅम्पियनशिपमध्ये १२ खेळाडूंनी भालाफेकीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. महत्त्वाचे म्हणजे नीरजपाठोपाठ भारताचा दुसरा भालाफेकपटू रोहित यादव यानेदेखील भालाफेकीची अंतिम फेरी गाठली होती. तो पात्र होणाऱ्या १२ जणांच्या यादीत ११व्या स्थानी होता. आज अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात ७८.५ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ७७.९६ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात ७८.५ मीटर अंतरावर भालाफेक करून तो आठव्या स्थानावर होता.