पुणे – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांना झाली आहे. पुण्यातील येरवडा पोलिसात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी येरवड्यातील एका २३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. या महिलेचा पती व करुणा शर्मा यांच्यावर आपल्याला शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करून पतीसोबत घटस्फोट घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला होता.
तक्रारीनुसार, फिर्यादी व पती उस्मानाबादला राहत होते. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची करुणा शर्मा यांच्यासोबत ओळख झाली. फिर्यादीचा पती वारंवार करुणा शर्मा यांच्या घरी राहू लागला. त्यानंतर फिर्यादी व पती पुण्यात येऊन स्थायिक झाले. तेव्हादेखील पतीचे शर्मा यांच्याशी बोलणे सुरूच होते. महिलेने याबाबत पतीला विचारले असता त्याने करुणा शर्मा यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. दरम्यान, यावर्षी काही महिन्यांपूर्वी कार्यक्रमाला जायचे सांगून पतीने फिर्यादीला भोसरी येथे नेले. तिथे करुणा शर्मा यांनी हाॅकीस्टीकचा धाक दाखवत त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी महिला पतीच्या शोधासाठी ३ जून रोजी मुंबईतील सांताक्रुझ येथील ग्रीन इमारतीत करुणा शर्मा यांच्या घरी गेली होती. याठिकाणी पतीने करुणा शर्मा यांना फोन लावला. त्यानंतर करुणा यांनी महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून पतीला घटस्फोट दे, नाहीतर जीव गमवावा लागेल, अशी धमकी दिली. आता या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव करत आहेत.
दरम्यान, अजयकुमार विष्णू देडे (वय 32, रा. शिवाजीनगर, उस्मानाबाद), करुणा शर्मा (वय 43, रा. सांताक्रुझ, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात जीवे मारण्याची धमकी देणे, अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ऍट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.