सेवानिवृत्तीधारकांनी आपले हयात प्रमाणपत्र २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर केले नाही तर त्यांना पेन्शन मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे सेवानिवृत्ती धारकांनी या मुदतीत हयात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे पीएफ कार्यालयाने म्हटले आहे.
सेवानिवृत्तीधारकांना पेन्शनसाठी दरवर्षी हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते. यापूर्वी हयात प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ होती. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेकांना ते सादर करता आले नाही. त्यामुळे निवृत्तीधारकांना मुदतवाढ दिली आहे. आता त्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करता येईल. ते ऑनलाइनही सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र या मुदतीनंतर जे हयात प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, त्यांना पेन्शन मिळण्यात अडचण येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.