देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा बँक घोटाळा सीबीआयने उघडकीस आणला आहे. गुजरातच्या एबीजी शिपयार्ड लिमिटेडने २८ बँकांची सुमारे २२ हजार ८४२ कोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सीबीआयने कंपनीचे अध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल, कार्यकारी संचालक संथानम मुथास्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशील कुमार आणि रवि विमल नेवेतिया यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार हे गुन्हे नोंदवले आहेत. २०१२ ते १७ या काळात हा घोटाळा झाला आहे.
एबीजी शिपयार्ड लिमिटेड ही एबीजी समूहाची प्रमुख कंपनी आहे. नवीन जहाजांची बांधणी आणि दुरुस्तीचे काम ती करते. भारतीय जहाज बांधणी उद्योगातील मोठी कंपनी म्हणून ती ओळखली जाते. गुजरातच्या दहेज आणि सुरत येथे कंपनीचे प्लांट आहेत. कंपनीने १६ वर्षांत १६५ पेक्षा अधिक जहाजे बांधली आहेत. त्यात निर्यात बाजारासाठी बांधलेल्या ४६ जहाजांचा समावेश आहे. या कंपनीने २८ बँका आणि वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतली. त्यात सर्वाधिक म्हणजे ७ हजार ८९ कोटींचे कर्ज आयसीआयसीआय बँकेकडून घेतले आहे. आयडीबीआयकडून ३ हजार ६३९ कोटी, स्टेट बँकेकडून २ हजार ९२५ कोटी, बँक ऑफ बडोदाकडून १ हजार ६१४ कोटी आणि पंजाब नॅशनल बँकेकडून १ हजार २४४ कोटी अशी एकंदर २८ बॅंकांकडून सुमारे २२ हजार ८४२ कोटींची कर्जे घेतली. हे पैसे त्यांनी दुसऱ्या संस्थांकडे वर्ग करून कर्जे थकवली. या प्रकरणी ८ नोव्हेंबर २०१९ मध्ये एका बँकेने सीबीआयकडे पहिली तक्रार नोंदवली. त्यानुसार सीबीआयने १२ मार्च २०२० रोजी एबीजी शिपयार्ड कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर ऑगस्ट २०२०ला या बँकेने नवी तक्रार दाखल केली. या प्रकरणाची जवळपास दीड वर्षे चौकशी केल्यानंतर सीबीआयने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी कंपनीच्या विरोधात फसवणूक केल्याचा एफआयआर नोंदवला. कंपनीने २०१२ ते १७ दरम्यान संगनमताने बँकांचा विश्वासघात आणि फसवणूक केल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघडकीस झाले आहे. मद्यसम्राट विजय मल्ल्याने बँकांकडून सुमारे ९ हजार कोटींची कर्जे घेऊन फसवणूक केली आहे. निरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेची सुमारे १४ हजार कोटींची फसवणूक केली आहे. या दोन्ही प्रकरणांचा सीबीआय तपास करत आहे. त्यात आता या जहाज कंपनीच्या २२ हजार ८४२ कोटींच्या नव्या घोटाळ्याची भर पडली आहे. देशातील आजवरचा हा सर्वात मोठा बँक घोटाळा आहे.