संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

२९ एप्रिलपासून सर्वत्र घुमणार ‘चंद्रमुखी’च्या घुंगरांचे बोल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवीन वर्षात मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिनाच घेऊन आले आहेत. एका पेक्षा एक चित्रपट प्रदर्शित होत असतानाच त्यात आता भर पडणार आहे एका भव्य चित्रपटाची. ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ असे जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिल्यानंतर प्रसाद ओक आता ‘चंद्रमुखी’ हा बहुचर्चित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट २९ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

टिझरमध्ये ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगना दिसत आहे. तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ.पाहायला मिळत आहे. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय रशीली प्रेमकहाणी प्रेक्षकांना ‘चंद्रमुखी’मध्ये पाहायला मिळणार आहे.

‘चंद्रमुखी’बद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट आशय देण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. त्यानुसार एक दर्जेदार कलाकृती आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. प्रसाद ओकसोबत काम करताना निश्चितच आनंद होत आहे. यापूर्वी प्रसाद ओकने आपल्या दोन्ही चित्रपटांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले आहेत. यावरून प्रसाद किती संवेदनशील दिग्दर्शक आहे, हे आपल्याला कळलेलेच आहे. यापूर्वीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र मधल्या काळात थिएटर बंद असल्याने याचे पदार्पण थांबवावे लागले. मात्र आता सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आली असून मला वाटले ‘चंद्रमुखी’ प्रदर्शित करण्याची हीच योग्य वेळ आहे. ही एक वेगळी प्रेमकहाणी आहे. मला खात्री आहे, प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतील.” तर गोल्डन रेशो फिल्म्सचे सीओओ पियुष सिंग म्हणतात, ‘प्लॅनेट मराठीसोबत काम करण्याचा अनुभव खूपच अनोखा असतो. हा प्लॅनेट मराठीसोबतचा तिसरा प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाची कथा अतिशय दमदार आहे. दिग्दर्शक, कलाकार एकंदरच चित्रपटाची संपूर्ण टीमच जबरदस्त आहे आणि मुख्य म्हणजे बऱ्याच काळानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने अजय – अतुलचे मराठीत पुनरागमन होत आहे आणि तेही तमाशाप्रधान चित्रपटातून. हा एक भव्य चित्रपट आहे आणि याची भव्यता प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहताना नक्कीच दिसेल.”

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय – अतुल या दमदार जोडीने ‘चंद्रमुखी’ला संगीत दिले आहे. या चित्रपटातील ‘चंद्रमुखी’आणि इतर कलाकारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami