फिनलंड – जगप्रसिद्ध मोबाईल ब्रँड असलेल्या नोकिया कंपनीने आपल्या लोगोमध्ये बदल केला. तब्बल ६० वर्षांपासून या कंपनीने एकच लोगो ठेवला होता.
मात्र, आता रंगीबेरंगी आणि ५ वेगवेगळ्या डिझाईन वापरुन नवा लोगो तयार करण्यात आला. या नव्या परिचय चिन्हासह या कंपनीने बाजारात पुन्हा पदार्पण करण्याचे संकेतच दिले आहेत. यापूर्वीचा लोगो केवळ निळ्या आणि पांढऱ्या रंगात अतिशय साधारण होता.
‘कंपनीची प्राथमिकता आता केवळ स्मार्टफोन्स नाही. तर, नोकिया आता वेगवेगळ्या बिझनेस आणि टेक्नॉलॉजीत विस्तार करणार आहे. ज्यामध्ये, गुंतवणूक हाही बिझनेस असणार आहे असे, नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांनी म्हटले. नोकियाने काही दिवसांपूर्वीच ‘नोकिया जी२२’ हा स्मार्टफोन काढला. या मोबाईल फोनचे बॅक कव्हर १०० टक्के रिसायकल्ड प्लास्टिकपासून बनविण्यात आले आहे. तसेच याची बॅटरी, डिस्प्ले, चार्जिंग पोर्ट या प्रत्येक गोष्टीला ग्राहक घरीच ठीक करु शकतात. त्यासाठी फोनसोबत कंपनीकडून दुरुस्तीचे सामानही देण्यात येणार आहे. याद्वारे फोनमधील कुठलाही पार्ट सहजपणे बदलता येणार आहे.