संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 02 December 2022

९४ व्या अ. भा मराठी साहित्य संमेलनाला ‘मुहूर्त’ मिळाला, स्थळही ठरले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – कोरोनामुळे पुढे ढकलेले गेलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर नाशिकमध्येच होणार आहे. संमेलनाची मैफील येत्या ३ ते ५ डिसेंबरमध्ये भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावर्षी मार्च महिन्यात २६ ते २८ मार्चच्या दरम्यान हे साहित्य संमेलन होणार होते. त्यासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या. त्या संबंधितांपर्यंत पोहचल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले. नोव्हेंबर महिन्यातील १९,२०, २१ या तीन तारखांचा विचार आयोजकांकडून सुरू होता. मात्र, आता या तारखांत बदल करून हे संमेलन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याबाबत बैठकीत एकमत झाले आहे.  दि. ३ रोजी सकाळी दिंडी निघणार आहे. संध्याकाळी इतर कार्यक्रम होणार आहे. ४ रोजी कार्यक्रम होणार आहे. ५ रोजी समारोप होणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन केले जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या वेळी जयप्रकाश जातेगावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

तीन ते पाच डिसेंबर या तारखांसाठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी होकार दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. हे संमेलन नाशिककरांचे व्हावे, यादृष्टीने संयोजकांकडून प्रयत्न सुरू होते. त्यातच संमेलन भुजबळ नॉलेज सिटी मध्ये घेण्याबाबत संयोजकांनी महामंडळाला कळविले आहे. संमेलन भुजबळ नॉलेज सिटीमध्ये घेतल्यास खर्चात बचत होईल, असे संयोजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संमेलनाच्या तारखा व संमेलन कुठे होणार, याची उत्सुकता साहित्य रसिकांना लागून होती.

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तारखांवरून निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यात चांगलीच पत्रापत्री रंगली होती. विशेष म्हणजे संमेलन पुढे ढकलण्याला ठाले-पाटलांनी पत्र लिहून आक्षेप घेत नाराजी दर्शवली होती. यावरून पालकमंत्री छगन भुजबळ व निमंत्रक जातेगावकर म्हणाले की, ठाले – पाटील नाराज नाहीत. शिवाय मंगलाताई नारळीकरांच्या प्रकृतीबाबत तक्रारी होत्या. तसे जयंत नारळीकरांनी आपल्याला सांगितले होते. त्यामुळे या संमेलनाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. आता कोणीही नाराज नाही. सर्व काही व्यवस्थित पार पडेल. ठरल्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ३ ते ५ या दरम्यान साहित्य संमेलन होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला एखाद्या मोठ्या साहित्यिकाला बोलावले जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलन भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होईल. त्याची तयारी झाली आहे. लवकरच उद्घाटक ठरतील. त्यानुसार आपल्याला माहिती देण्यात येईल. या संमलेनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami