वॉशिंग्टन- ९/११ हल्ल्याचा बदला अमेरिकेने घेतला. अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी रविवारी सकाळी ६.१८ वाजता काबूलमध्ये ड्रोन हल्ल्यात ठार झाला. अमेरिकेचे सैनिक अफगाणिस्तानातून निघून गेल्यावर ११ महिन्यांनी केलेली ही मोठी कारवाई आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर काबूलमध्ये आश्रय घेतलेला जवाहिरी कोणत्या घरात राहतो, याची पक्की माहिती मिळाल्यानंतर सकाळी बाल्कनीत उभ्या असलेल्या जवाहिरीला अमेरिकन ड्रोनने अचूक लक्ष्य केले. ओसामा बिन लादेननंतर अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी लढाईला मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले.
११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर अतिरेकी हल्ला झाला होता. त्यात ३ हजार नागरिक ठार झाले होते. हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेन होता. तो अल कायदा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष होता. २०११ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानात लपलेल्या लादेनला ठार मारले. त्यानंतर दहशतवाद विरोधी लढाईत अमेरिकेला मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे. त्याच्यावर २५ मिलियन डॉलरचे इनाम होते. अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरातील एका घरात अल कायदाचा प्रमुख जवाहिरी रहात होता. त्याची माहिती मिळाल्यावर अमेरिकेने रविवारी ३१ जुलैला सकाळी ड्रोन ६.१८ वाजता ड्रोन हल्ला चढवला. त्यात घराच्या बाल्कनीत उभा असलेला अल-जवाहिरी ठार झाला. जगभर दहशत माजवणाऱ्या आणि अमेरिकेवर अतिरेकी हल्ला चढवणाऱ्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा तो प्रमुख होता. अमेरिकेने २०११ मध्ये पाकिस्तानात केलेल्या कारवाईत ओसामा बिन लादेन ठार झाला. त्यानंतर संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा अतिरेकी असलेला जवाहिरी या संघटनेचा प्रमुख नेता बनला होता. अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात त्याचाही सहभाग होता. या हल्ल्यात ३ हजारांपेक्षा अधिक नागरिक ठार झाले होते. त्यानंतर अमेरिकेने अल-कायदावर बंदी घालून ओसामा बिन लादेन, अल-जवाहिरी यांच्यासह इतरांना जागतिक अतिरेकी म्हणून घोषित केले होते. त्यांच्यावर अब्जावधी डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. काही दिवसांपासून अल-जवाहिरी आजारी असल्याच्या बातम्या येत होत्या. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने काबुलवर कब्जा केला. त्यानंतर जवाहिरीला तेथे आश्रय मिळाला. रविवारी ३१ जुलैला अमेरिकेने काबुलवर ड्रोन हल्ला चढवला. त्यात जवाहिरी हा एकच अतिरेकी ठार झाला. यामुळे आता न्याय झाला आहे. जवाहिरी हा दहशतवादी जगात राहिलेला नाही, असे बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये सांगितले.