संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

युक्रेनमध्ये अडकले महाराष्ट्रातील बाराशे विद्यार्थी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कीव – रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका तिथे अभ्यासासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना बसला आहे. तेथील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या मायदेशी परतायचे आहे, मात्र हवाई मार्ग बंद असल्याने त्यांचा परतीचा मार्ग बंद झाला आहे. त्यातच, एकट्या महाराष्ट्रातील तब्बल १२०० विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांनी प्रशासनाशी संपर्क ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार युक्रेनमध्ये जवळपास वीस हजार विदेशी नागरिक अडकले आहेत. यामध्ये अठरा हजार भारतीय नागरिक असून यापैकी विविध विद्यापीठात शिक्षण घेत असलेले दोन हजार विद्यार्थी आहेत. या दोन हजार विद्यार्थ्यांपैकी १२०० विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली जात आहे.

नाशिकची आदिती देशमुख आणि प्रतीक जोंधळे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. खर्कीव्ह प्रांतातील हॉस्टेलमध्ये ते राहतात. त्यांच्यासोबत इतरही भारतीय विद्यार्थी आहेत. तर, अकोला शहरातील व्हीएचबी कॉलनीमधील रहिवासी असलेल्या जॅकशारोन एडवर्ड निक्सन हा वीस वर्षीय युवकही युक्रेनमध्ये अडकला आहे. युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहरातील डायलो हॅलीस्काय नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. 

काही ठिकाणचे हवाई मार्ग बंद करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकिटांचे दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना आपल्या मायदेशी परतणे कठीण झाले आहे. रशिया-युक्रेन युद्धाने जगात अशांतता निर्माण केली आहे. रशियाच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर देण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. त्यामुळे हे युद्ध केव्हा संपेल आणि जीवन पूर्वपदावर येईल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. म्हणूनच तिथे नोकरी आणि शिक्षणासाठी गेलेले विदेशी नागरिक आपल्या मायदेशी परतण्याचा प्रयत्न करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami