मुंबई – देशभरातील तब्बल 15 राज्यात आज राज्यसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. राज्यसभेच्या एकूण 57 जागांसाठी मतदान पार पडत आहे. मात्र 15 राज्यात मिळून एकून 57 उमेदवारांसाठी मतदान होत असले तरी 15 पैकी 11 राज्यातील उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्या 11 राज्यातील 41 उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत, त्यामुळे 4 राज्यांतील 16 उमेदवारांसाठी आज मतदान पार पडत आहे. यात महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांचा सामावेश आहे.
तामिळनाडूमध्ये 6 उमेदवार, बिहारमध्ये 5 उमेदवार, आंध्रप्रदेशमध्ये 4 उमेदवार, मध्यप्रदेशमध्ये 3 उमेदवार, ओडिसामध्ये 3 उमेदवार, छत्तीसगढमध्ये 2 उमेदवार, झारखंडमध्ये 2 उमेदवार, पंजाबमध्ये 2 उमेदवार, उत्तराखंडमध्ये 1 उमेदवार आणि तेलंगणामध्ये 2 उमेदवार राज्यसभेसाठी बिनविरोध निवडून गेले आहेत. तर, उत्तरप्रदेशमध्ये 11 उमेदवारांसाठी निवडणुका पार पडणार होत्या. त्यापैकी 8 भाजपा, 1 समाजवादी पार्टी, RLD 1 आणि IND 1 असे 11 उमेदवार बिनविरोध निवडून देण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील 6 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीसाठी भाजपाने 2, शिवसेनेने 2, राष्ट्रवादीने 2 आणि काँग्रेसने 1 उमेदवार उभा केला आहे. महाराष्ट्रात एकूण सात उमेदवार असून जागा 6 आहेत. त्यामुळे एका उमेदवाराला पराभूत व्हावे लागणार आहे. आज विधानभवनात मतदान पार पडत असून १२ वाजेपर्यंत १८० उमेदवारांनी मतदान केले आहे. आज सायंकाळच्या दरम्यान मतदान पूर्ण होऊन निकाल लागणार आहे.