मुंबई – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे कथित रायगडच्या कोलेई गावातील 19 बंगल्यांच्या घोटाळ्याची सर्व माहिती राज्यपालांना भेट घेऊन दिली आणि त्याबाबत चर्चा देखील केली असल्याचे सोमय्यांनी सांगितले. तसेच 19 बंगल्यांबाबत मुख्यमंत्री बोलत का नाही, आपली बाजू का मांडत नाही?, असा सवाल सोमय्यांनी विचारला.
सोमय्या म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे माफियाखोरांना मदत करत आहेत. योगायोगाने आज नवाब मलिक यांचे कारस्थान आता जनतेसमोर येत आहे. अशा व्यक्तीला तांत्रिकदृष्ट्या मंत्रिमंडळात राहण्याचा हक्क आहे का?, हे तपासले पाहिजे, मलिकांची चौकशी सुरु झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सकाळपासून किरीट सोमय्या-ई़डी कनेक्शनचा धोशा लावला आहे. मी दिलेली माहिती खरी आहे की नाही?, यावर कोणीही बोलतच नाही. जे काही आहे ते ईडीच्या चौकशीतून बाहेर येईल, नवाब मलिकांची घोटाळ्याची माहिती मी दिली होती. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांपासून राज्यपाल आणि सर्व तपास यंत्रणांना माहिती दिली होती. माझ्याकडे पुरावे असल्याने मी लोकांसमोरही माहिती ठेवली. मागील सहा महिन्यांपासून नवाब मलिकांच्या विविध घोटाळ्यांचे मी पुरावे देखील दिले आहेत, असे सोमय्या यांनी म्हटले. उद्धव ठाकरे 19 बंगल्यांबाबत एकही शब्द का बोलत नाहीत? हजारो लोकांच्या जीवांशी खेळण्याचे पाप संजय राऊत यांचा पार्टनर सुजीत पाटकरने केले. अजित पवारांनी त्याला ब्लॅकमेल केले त्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार का बोलत नाहीत? असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे.