नवी दिल्ली -भारत येत्या आठ वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थसत्ता, महासत्ता होईल. तर अजून 25 वर्षांनी जागतिक अर्थव्यवस्था होण्यापासून देशाला कोणीही रोखू शकणार नाही. हा दावा जगातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी केला आहे. मुंबई येथे आयोजीत वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाऊंटेंट्स 2022 मध्ये त्यांनी हे वक्तव्य केले होते.
गौतम अदानी यांच्या दाव्यानुसार, येत्या तीन दशकांमध्ये भारत उद्योजकता कार्यक्रमात गतीने पुढे जाईल. भारताने 2021 मध्ये जागतिक स्तरावर रिअल टाईम ट्रॅन्झॅक्शनमध्ये इतिहास रचला. अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि जर्मनीच्या एकूण व्यवहारांपेक्षा हा आकडा 6 पट जास्त आहे. या सर्व देशांनी चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी तयारी पूर्ण केली आहे. यामध्ये मानव आणि मशीन यांच्यात सुसंवाद राहील. भारतात वेगाने वाढणारे स्टार्टअप्स भारतीय व्हेंचर कॅपिटलला प्रोत्साहन देतील. मोठा निधी उभारण्यास मदत करतील. भारतात पहिल्या व्हीसी फंडिंगमध्ये, निधीत केवळ आठ वर्षांतच 50 अरबचा टप्पा ओलांडला आहे. भारत ग्रीन पॉवर क्षेत्रात गतीने पुढे जात आहे. सौर ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन या भविष्यातील मोठ्या संधी आहेत. ऊर्जेचे पूनर्वापर करण्यासाठी हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसीत होत असल्याचे अदानी यांनी सांगितले.