कॅनडातील राम मंदिराची विटंबना
भिंतीवर भारतविरोधी घोषणा
मिसिसोंगा- कॅनडामधील मिसिसोंगा येथील राम मंदिराची तोडफोड करून त्यावर भारतविरोधी घोषणा लिहिल्याची घटना मंगळवारी घडली आहे. भारतीय नागरिकांनी या घटनेचा निषेध केला होता. टोरंटो येथील भारताच्या दूतावासाने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच दूतावासाने या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
राम मंदिराच्या भिंतीवर ‘पंतप्रधान मोदींना दहशतवादी घोषित करा , ‘संत भिंडरावाला शहीद आहेत’, ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. “राम मंदिरावर लिहिण्यात आलेल्या भारतविरोधी घोषणांचा आम्ही निषेध करतो. आम्ही कॅनडा प्रशासनाकडे याप्रकरणी चौकशीची मागणी केली असून गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे,” असे ट्वीट भारतीय दुतावासाने केले आहे.दोन आठवड्यापूर्वी येथील गौरी शंकर मंदिरावर देखील अशाच घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. कॅनडामध्ये हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी जानेवारीमध्ये कॅनेडातील ब्राम्प्टन येथील हिंदू मंदिरावर भारतविरोधी घोषणा लिहिण्याची घटना घडली होती. वर्षभरातली ही चौथी घटना आहे. ब्राम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला होती. पॅट्रिक ब्राऊन म्हणाले होते की, अशा घृणास्पद कृत्यांना आपल्या शहरात आणि देशात स्थान नाही. तसेच महापौर ब्राऊन यांनी शहर पोलीस प्रमुखांशी चर्चा करून या घटनेची चौकशी केली होती.