भारतात इन्फ्लूएंझा विषाणूमुळे
दोघांचा मृत्यू,९० जणांना संसर्ग
नवी दिल्ली – कोरोनानंतर देशात आता ‘एच३एन२’ इन्फ्लूएंझामुळे विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.देशात ‘एच३एन२’ इन्फ्लूएंझाची सुमारे ९० प्रकरणे नोंदली गेली आहेत. कर्नाटकातील हसनमधील ८२ वर्षीय व्यक्ती हा देशातील ‘एच३एन२’ मुळे मृत्यू पावणारा पहिला व्यक्ती आहे.आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेंट गौडा यांना २४ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि १ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही होता असे सांगण्यात येत आहे.तसेच ‘एच३एन१’ विषाणूचेही आठ रुग्ण आढळले आहेत.गेल्या काही महिन्यांपासून देशात फ्लूचे रुग्ण वाढत आहेत.बहुतेक संक्रमण ‘ एच३एन२’ विषाणूमुळे झाले असुन त्याला ‘हाँगकाँग फ्लू’ असेही म्हणतात.हा विषाणू देशातील इतर इन्फ्लूएंझा उप-प्रकारांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे.
लक्षणे आणि बचाव!
भारतीय मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनिल गोयल यांनी इन्फ्लूएंझाची लक्षणे सांगताना म्हटले आहे की,यात श्वासोच्छवासाचा त्रास,सतत ताप येणे,छाती किंवा पोटदुखी,स्नायू दुखणे, अशक्तपणा आणि चक्कर येणे,जुन्या आजाराची पुनरावृत्ती आणि सर्दी आणि खोकला ही या आजाराची खरी लक्षणे आहेत.तसेच ५ वर्षांखालील लहान मुले,६४ वर्षांपेक्षा जास्त वयाची वृद्ध, गर्भवती महिला,श्वसन आणि दमा रुग्ण,मधुमेह रुग्ण, कर्करोग रुग्ण यांच्यासाठी हा विषाणू फारच धोकादायक असतो. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे.तसेच खोकताना आणि शिंकताना नाकाला रुमाल लावावा.तसेच प्रदूषित ठिकाणी जाणे आणि बाहेर तळलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे.विशेष म्हणजे हात नेहमी धुत रहावे व जास्त पाणी प्यावे.ताप आल्यास पॅरासिटामॉल घ्यावी.ताप २-३ दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.