Interview with doctors : नाशिक, बदलापूर, ठाणे अशा अनेक शहरांत अलिकडे स्त्री-बीजाची बेकायदा विक्री होत आहे. याबाबत विक्री केंद्रावर धाडी टाकून अनेकांना अटक झाली. स्त्री-बीज विक्री हा प्रकार काय आहे? या विक्रीच्या बातम्या अचानक एका मागे एक का येऊ लागल्या आहेत? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबईच्या विलेपार्ले येथील प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ रश्मी फडणवीस यांनी विशेष मुलाखतीत अचंबित करणारी माहिती दिली.
प्रश्न: स्त्री-बीज विक्री आणि ही विक्री करणार्यांवर धाडी पडणे या बातम्या अलीकडे सतत येत आहेत. स्त्री-बीज विक्री हा काय प्रकार आहे?
डॉ. रश्मी – एखाद्या महिलेला काही शारीरिक कारणांमुळे मूल होत नसेल किंवा तिच्या नवर्यामध्ये काही दोष असेल किंवा तिचे रजोनिवृत्तीचे वय आले असेल म्हणजेच मेनपॉजचे वय आले असेल आणि तिला माता बनायचे असेल तर ती काय करू शकते? ती दुसर्या महिलेचे स्त्री-बीज घेऊन गर्भधारणेचा प्रयत्न करू शकते, यासाठी तिला स्त्री-बीज आवश्यक असतात, अशा परिस्थितीचा फायदा घेऊन हजारो, लाखो रुपयांतस्त्री-बीज पुरवठा करण्याचा बेकायदा धंदा सुरू झाला आहे. स्त्री-बीज विक्री ही अलीकडची घटना नाही. मूल होत नाही म्हणून मूल दत्तक घेतले जात होते, पण दत्तक प्रक्रियेत गैरप्रकार होऊ लागल्याने त्याचे नियम अत्यंत कडक झाले. त्याचा दुष्परिणाम असा झाला की, दत्तक प्रक्रिया अत्यंत किचकट झाली. त्यातून मग दुसर्याच्या गर्भात आपले मूल वाढविणे हा मार्ग आला. त्याचेही कायदे कडक झाले तेव्हा दुसर्या महिलेचे स्त्री-बीज घेऊन गर्भधारणा हा मार्ग सोपा आहे. हे घडले तेव्हापासून कायदेशीर आणि बेकायदेशीर अशा दोन्ही मार्गाने स्त्री-बीज विक्री सुरू आहे. आता बेकायदेशीर विक्री केंद्रांवर धाडी पडल्याच्या बातम्या येऊ लागल्याने लोकांचे त्याकडे लक्ष गेले आहे.
प्रश्न – स्त्री-बीजे का विकत घेतात?
डॉ. रश्मी – स्वत:चे स्त्री-बीज सक्षम नसतील तर गर्भधारणेसाठी दुसर्या स्त्रीचे सक्षम स्त्री-बीज विकत घेतले जाते.
प्रश्न: स्त्री-बीज विकत घेतात तसेच पुरुषांचे पु-बीजही विकत घेतले जाते का?
डॉ. रश्मी – काही अंशी पु-बीज विकत घेतले जाते. पु-बीज उपयोगी ठरायचे असेल तर त्याची क्षमता काही तासांसाठीच असते. स्त्री-बीज मात्र अनेक तास सक्षम राहते, त्याचे वहन करणे सोपे जाते. कारण क्षमता काही तासांपुरतीच मर्यादित नसते. एका महिलेच्या शरीरात तिचे प्रजनन क्षमतेचे वय असते तोपर्यंत 400 स्त्री-बीजे तयार होतात.
प्रश्न- या स्त्री-बिजांचा उपयोग कसा केला जातो?
डॉ. रश्मी – कृत्रिमरित्या गर्भधारणेसाठी या स्त्री-बिजांचा उपयोग केला जातो. ही गर्भधारणा तीन-चार प्रकारे केली जाते. स्त्रीचा अंडकोष सक्षम असतो तेव्हा स्त्री-बीज काढून पतीच्या पु-बीजाशी त्याचा संयोग केला जातो आणि ते फलित झाले की, त्या महिलेच्या गर्भाशयात सोडतात. तिथे गर्भधारणा व गर्भवाढ होते. काही वेळा स्त्रीचे स्त्री-बीज सक्षम नसते, मग ती दुसर्या स्त्रीचे स्त्री-बीज घेते आणि पतीच्या पु-बिजाशी संयोग घडवून ते फलित बीज महिलेच्या गर्भाशयात सोडून गर्भधारणा करतात. कधी कधी महिलेचे स्त्री-बीज आणि तिच्या पतीचे पु-बीज हे दोन्ही सक्षम नसतात. त्यामुळे मग दुसर्या महिलेचे स्त्री-बीज आणि दुसर्याच पुरुषाचे पु-बीज घेऊन त्याचा संयोग घडवून ते फलित बीज महिलेच्या गर्भाशयात सोडतात. आणखी एक उपाय म्हणजे दुसर्याच महिलेच्या गर्भाशयात पती पत्नीची बीजे सोडून तिच्या गर्भाशयात गर्भधारणा करणे ज्याला सरोगसी म्हणतात.
प्रश्न: अलीकडे सरोगसी व दत्तक घेण्याचे कायदे कडक झाल्याचा काय परिणाम झाला?
डॉ. रश्मी – पूर्वी एखादी अविवाहित कन्या गर्भवती राहिली तर ती बाळाला जन्म देऊन बाळ रुग्णालयात सोडून जायची. अशा वेळी रुग्णालय ते बाळ कुणालातरी दत्तक द्यायचे. अनेक मुले परदेशात दत्तक दिली जात होती, पण आता दत्तक कायदा कडक झाल्याने हा प्रकार जवळजवळ बंदच झाला आहे.
प्रश्न : मग आता काय करतात?
डॉ. रश्मी- स्त्री-बीज देतात किंवा स्त्री-बीज व पु-बिजाचा संयोग
करून ते देतात.
प्रश्न: याची प्रक्रिया काय आहे?
डॉ. रश्मी- ज्या महिलेची स्त्री-बीज घ्यायची तयारी असते ती सशक्त असायला हवी, गरीब कुपोषित असल्याने त्यांचे स्त्री-बीज तितके सक्षम नसते. त्यामुळे गरीब महिलांचे स्त्री-बीज घेण्याचे प्रमाण कमी आहे. तर महिलेला इंजेक्शन द्यावे लागते. त्यामुळे अंडकोषातून स्त्री-बीज बाहेर निघते. हे स्त्री-बीज सक्षम आहे का ते सोनोग्राफी करून पाहतात. ती स्त्री-बीजे सक्षम असतील तर सिरींजमध्ये ती ओढून घेतात, कधी पाच मिळतात, कधी अधिक असतात, मग ही स्त्री-बिजे गोठवतात आणि जशी मागणी येईल तशी विकतात. जी महिला स्त्री-बीज विकते तिला हजारो रुपये मोबदला दिला जातो, अशी प्रक्रिया होते.










