लखनऊ – २५ वर्षांची युती तुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेने नेहमीच एकमेकांवर आगपाखड केली आहे. आता शिवसेनेने उत्तर प्रदेशात आपले उमेदवार उभे केले असून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज गोरखपूर येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपवर टीका केली. महाराष्ट्रात मागील सरकारच्या काळात आम्ही भाजपसोबत होतो याचं दुःख वाटतं अशी कबुली दिली. तसेच, उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवरही टीका केली.
शिवसेनेने आपला पक्ष वाढवण्यासाठी इतर राज्यातही नशीब आजमवाण्याचे ठरवले आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशातही शिवसेनेचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. या उमेदवाराच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे गोरखपूरमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊतही उपस्थित होते.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये द्वेषाचे राजकारण नको. प्रत्येक वेळी इथे लोकांना भीती दाखवली जाते. मात्र, प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत घाबरायचं कशाला? महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता. या मोर्चाला बदनाम करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या हाती लाल झेंडे असल्याने त्यांना नक्षलवादीदेखील संबोधले. त्या सरकारमध्ये आम्ही होतो. त्याचे दु:ख वाटते. काही चुकीचे निर्णय घेण्यात आले होते, असेही आदित्य यांनी म्हटले.
कोरोना काळात उत्तर प्रदेशातील अनेकजण मुंबईत अडकले होते. या बांधवांची महाराष्ट्रात शिवसेनेने काळजी घेतली असंही आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी केंद्र सरकरावरही तोफ डागली. ते म्हणाले की, मुंबईतील उत्तर प्रदेशमधील कामगारांना गावी जाण्यासाठी केंद्राने अडवणूक केली. स्पेशल ट्रेनची मागणी दोन महिन्यांनी मान्य करण्यात आली. मात्र, या स्पेशल ट्रेनसाठीही तिकीट आकारणी करण्यात आली. यासाठी महाराष्ट्राने मुख्यमंत्री सहाय्य निधीतून मदत केली.