सातारा – किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री या निर्णयाचा महाराष्ट्र सरकारने फेरविचार करावा यासाठी आज गुरुवारी व्यसनमुक्त युवक संघाने साताऱ्यात दंडवत-दंडुका आंदोलन केले. हे आंदोलन सुरु हाेण्यापुर्वी पाेवई नाका येथे पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ जोरदार खडाजंगी झाली.
आंदोलनस्थळी भाषण करताना बंडा तात्या कराडकर यांनी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.यावेळी बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील गंभीर टीका केली. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पिऊन नाचतात, सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साधे आहेत आणि चांगल्या वळणाचे आहे. पण शेतकऱ्यांची म्हण आहे त्या प्रमाणे ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला. तसे ढवळा हे अजितदादा आणि पवळ्या हे उद्धव ठाकरे आहेत. त्यांना अजितदादांनी दारू विक्रीचा गुण लावला आहे.
आंदोलनात बंडातात्या कराडकर यांच्यासह व्यसनमुक्त युवक संघचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले होते. पाेवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदाेलकांनी दंडवत घालून सरकाराच्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा विराेध केला.