संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राकडून दुजाभाव; भुजबळांचा आरोप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – आज सगळीकडे मराठी भाषा गौरव दिन साजरा होत असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रावर गंभीर आरोप केला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता केंद्राकडून दूजाभाव केल जातोय असा आरोप भुजबळांनी केला आहे. छगन भुजबळ नाशिकमध्ये बोलत होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता केंद्राला चार हजार पोस्ट कार्ड पाठवण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ही पोस्टकार्डे देण्यात आली.

“मराठी भाषेला अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. त्यामुळे या भाषेला गेल्या सात वर्षांपासून अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता लढा सुरू आहे. या सात वर्षांच्या काळात अनेक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मात्र, मराठी भाषेला दर्जा देताना दुजाभाव केला जातोय” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनीही असाच आरोप केला होता.

छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई सारेच मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे एक ना एक दिवस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावाच लागेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

भाषेला अभिजातचा दर्जा कसा मिळतो?

एखाद्या भाषेला अभिजातचा दर्जा देण्याकरता ती भाषा एक ते दीड हजार वर्षे जुनी भाषा असणे गरजेचे आहे. त्या भाषेतील साहित्य श्रेष्ठ असावे लागते. त्या भाषेचे मूळ रुप आणि आत्ताचे रुप यांच्यात साम्य असावे. हे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते. त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तसा अहवालही केंद्र सरकारला पाठवला आहे. आतापर्यंत तमिळ, संकृत, तेलगू, मल्याळम, उडिया आणि कन्नड या सहा भाषांना अभिजातचा दर्जा देण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami