किश्तवाड – जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाडमधील चिनाब नदीजवळ भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये भारतीय लष्कराचे तीन अधिकारी होते. मागील दोन-तीन दिवसांपासून या भागात पाऊस पडत आहे. लष्कराच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात तीन अधिकार्यांना दुखापत झाली आहे. सध्या ते सुरक्षित आहेत.
जखमी पायलटना उपचारासाठी उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या या हेलिकॉप्टरचे नाव एएलएच ध्रुव होते. या घटनेची लष्करी न्यायालयाकडून चौकशी होणार अशीही माहिती समोर येत आहे. याआधी मार्चमध्ये अशीच घटना घडली होती. भारतीय लष्कराचे चिता हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशमध्ये मंडाला हिल्स भागात कोसळले होते. या हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलटना वीरमरण आले होते.
जम्मूत लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले
