संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 06 October 2022

ह.भ.प. बंडातात्यांचा पायी वारीचा हट्ट का?- जयश्री खाडिलकर-पांडे

कोरोना संकटाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी आणि याहीवर्षी आषाढीनिमित्त संतांच्या पालखी बसने रवाना झाल्या आहेत. वारकऱ्यांचा आग्रह लक्षात घेऊन पालखीसह जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढविण्यात आली. सर्व संबंधितांशी चर्चा करून सर्वांना मान्य असा निर्णय झाला आणि अत्यंत उत्साहात पालखी निघाल्या. मात्र पंढरपूरचे ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी अचानक बंड करून पायी वारी सुरू केली आणि वारकऱ्यांसमवेत रस्त्यावरून टाळ-मृदंग घेऊन निघाले. परिणामी प्रशासनाची प्रचंड धावपळ झाली आणि ही घटना अत्यंत संवेदनशिलपणे हाताळून पोलीस प्रशासनाने ही पायी वारी स्थगित केली.

पण ह.भ.प. बंडातात्या यांनी हे बंड का केले? हा सवाल आहे. देशात अद्याप कोरोनाची दुसरी लाट आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे अद्यापही तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीत आहेत. कोल्हापूर आणि साताऱ्यात कोरोनाचे रुग्ण इतके वाढत आहेत की त्या जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचा धोका आहे. ही सर्व आंकड्यातून सिद्ध झालेली वस्तुस्थिती असताना पायी वारी काढणे कितपत योग्य आहे? एक पायी वारी निघाली की अनेक वारकरी त्यात सामील होत जातील आणि मग महाराष्ट्रभरात पायी वाऱ्या निघतील. यातून कोरोनाचा उद्रेक झाला तर कुणाला जबाबदार धरायचे? सरकारने चर्चा करून प्रश्‍न सोडवलेला असताना हजारो वारकऱ्यांचा जीव धोक्यात का घालायचा? ह.भ.प. बंडातात्या कीर्तनात नेहमी सांगतात की, जे मिळेल त्यात समाधान माना म्हणजे कशाचीही हळहळ राहत नाही. हळहळ राहिली नाही की रात्री पलंगावर पडताच झोप लागते आणि सकाळी उठताच शौचास होते. मग नव्वद टक्के वारकऱ्यांनी सरकारने काढलेला तोडगा मान्य केल्यावर त्यांनी समाधान का मानले नाही?
त्यांची पायी वारी निघाली आणि प्रशासन व पोलीस यांची तणावग्रस्त धावाधाव झाली. वारकऱ्यांचे मन न दुखावता मोठ्या कौशल्याने ही वारी थांबवावी लागली. ह.भ.प. बंडातात्या यांना गाडीत बसवून गावच्या घरी नेले आणि वारी स्थगित झाली. हे सर्व करताना पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी या सर्वांना कोरोनाच्या धोक्यात लोटले गेले. पायी वारीत सामील वारकऱ्यांनाही संकटात टाकले गेले. पोलिसांनी वारी स्थगित केली, पण केवळ ह.भ.प. बंडातात्या यांची समजूत काढायची नव्हती तर त्यांना पाठिंबा देणाऱ्यांनाही गप्प करावे लागले.

हिंदु सण व संस्कृती यावर अधिकारवाणीने बोलण्याचा हक्क भाजपाने सध्या आचार्य तुषार भोसले यांना दिला आहे. पायी वारी सुरू होताच त्यांनी आरोळ्या ठोकण्यास सुरुवात केली. आम्हीही पायी वारीत सामील होणार अशी घोषणा केली. मंदिरे उघडा यासाठी आचार्य तुषार भोसले यांनीच आततायी आंदोलन केले होते. अमरनाथ यात्रा, चार धाम यात्रा रद्द झाल्यावर ते काही बोलत नाहीत. महाराष्ट्रात मात्र दुसऱ्या लाटेतच मंदिरे उघडा म्हणून त्यांनी आंदोलन केले. दुसरी लाट अत्यंत गंभीर ठरल्यावर हे सर्व आवाज आपोआप बंद झाले. आता ते पुन्हा आवाज उठवू लागले. या सर्व बाबींमुळे गोंधळ उडतो. मने कलुषित होतात.

ह.भ.प. बंडातात्या यांच्याबद्दल सन्मानच वाटतो. 2013 साली देहूत डाऊ केमिकल येणार होते तेव्हा त्यांनीच मोठे आंदोलन उभारून अमेरिकेच्या या बड्या कंपनीला माघार घ्यायला लावली. ही कंपनी भोपाळ गॅस कांडाशी संबंधित होती. भ्रष्ट आचार आणि जीवघेणा व्यापार अशी या कंपनीची ख्याती होती. ही कंपनी केवळ संशोधन विभाग सुरू करणार आहे असे सांगत तत्कालिन कृषी मंत्री शरद पवार यांनी देहूत डाऊ कंपनीला मान्यता दिली होती. डाऊ विरोधातील आंदोलनावर कडाडून टीकाही केली होती. पण ह.भ.प. बंडातात्या आणि माजी न्या. कोळसे पाटील यांनी वारकऱ्यांचे आंदोलन यशस्वी केले.व्यसनमुक्ती बाबतही त्यांचे काम उत्तम आहे. परंतु कोरोना काळात त्यांनी घेतलेल्या भूमिका अनाकलनीय आहेत.

2020च्या नोव्हेंबर महिन्यात त्यांनी सरकारविरुद्ध पत्रक काढले. त्यात म्हटले होते की, महाराष्ट्रातील मंदिरे नरकासुराने आठ महिने बंद ठेवलेली असताना कोणती दिवाळी साजरी करायची? 2021 च्या एप्रिल महिन्यात ते म्हणाले की, कोरोना नाहीच आहे. कोरोनाची कल्पना ही बिल गेट्‌सच्या डोक्यातून निर्माण झाली आहे. कोरोनाची लक्षणे ही ताप, थंडी, सर्दीसारखी सामान्य लक्षणे आहेत. यावर आयुर्वेदात उपाय आहेत. पण सरकार या औषधांना प्राधान्य देत नाहीत कारण ती बिल गेट्‌सची नाहीत. त्यानंतर आता वारीबाबत प्रशासन आणि वारकरी यांच्यात समन्वय झालेला असताना पायी वारीचे आंदोलन केले. ह.भ.प. बंडातात्या यांनी समस्त जनतेचे हित लक्षात घेऊन समजुतीची भूमिका घेणे आवश्‍यक आहे. पुढील वर्षी पायी वारी होईलच. तोपर्यंत दुरून विठ्ठल दर्शनात समाधान मानायला हवे.

Share with :
Facebook
Twitter
Pinterest
LinkedIn

Leave a Comment

Your email address will not be published.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami