संपादकीय!आल्या मगरी, ढाळले अश्रू…. गरीब मेलाय, मरुदे, इतका कुठे विचार करू…

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागून दहा नवजात बालके तडफडून मेली. हे दु:ख त्यांचे आईवडील, आजी आजोबा, नातेवाईक कसे सहन करू शकतील? या बाळांचे नातेवाईक गेले आठ दिवस रुग्णालयाच्या अधिकार्‍यांना सांगत होते की, आयसीयूचे तापमान वारंवार कमी अधिक होते आहे त्याकडे लक्ष द्या. रुग्णालयाच्या अधिकार्‍यांनी स्वत:हून जरा हालचाल केली असती तर अनर्थ टळला असता. पण त्यांनी खुर्ची सोडली नाही, एक कागद काढला, त्यावर तक्रार लिहिली आणि सरकारकडे पाठवून दिली. सरकारे कोणतीही असो, प्रायव्हेटवाल्यांसाठीच चालतात, त्यांच्याच फायली हलतात. खिसे गरम करायचे, चिकनचे तुकडे खायला घालायचे आणि दारुनी आंघोळ घालायची. जास्त पैशाचे काम असेल तर मुली पुरवायच्या मगच फायली हलतात. त्यामुळे गरीबांसाठीच्या कामाच्या फायली धुळखात पडतात. वर्षानुवर्षे हेच बघतोय. सरकारचा रंग भगवा असो, हिरवा असो, नाहीतर धर्मनिरपेक्ष पांढरा असो, गरीब लाल रंगाच्या रक्तातच न्हातो. काही सरकारी कर्मचारी जनतेचे भले करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची टेर उडवली जाते, मग बदली होते, घरी शिव्या खायच्या आणि दारी शिव्या खायच्या हेच आयुष्य बनते.

भंडारा दुर्घटना घडल्यावर नेहमीचे चक्र फिरू लागते. सर्वात आधी नेता धावतो, जो याआधी कधीही त्या रुग्णालयाकडे फिरकलेला नसतो. प्रत्येक नेता येतो आणि ठरलेली वाक्य बोलतो. सत्ताधारी नेता म्हणतो की, आम्ही दु:खात सहभागी आहोत. सखोल चौकशी करू. दोषींना शिक्षा होईल. नातेवाईकांना भरपाई देऊ. मग विरोधी पक्ष नेता येतो आणि म्हणतो की, प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे, मंत्र्याने राजीनामा द्यावा, मृतांच्या नातेवाईकांना दोन दिवसांत भरपाई मिळाली पाहिजे. घटना घडल्यानंतर पाच तास हा तमाशा चालतो, दोन दिवस बातम्या येतात. तिसर्‍या दिवसापासून तो गरीब आणि त्याचे नशीब, आणखी काही उरलेले नसते.

आजवर इतक्या दुर्घटना घडल्या, एक मंत्री राजीनामा देत नाही. अधिकार्‍यावर फक्त बदलीची कारवाई होते आणि मग सर्व सामसूम झाली की, त्याला दुसर्‍या ठिकाणी मस्त पोस्ट मिळते, अग्निशमन दलाचे काही अधिकारी तर कवच कुंडले घेऊनच जन्मलतात. त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि त्यांची कधीही बदली होत नाही. नेतेमंडळी दु:ख व्यक्त करतात, पण दु:ख चेहर्‍यावर दिसत नाही. म्हणून तर त्यांच्या चेहर्‍यावर आणि कपड्यांवर कधीही एक सुरकुती दिसत नाही. सगळी सदैैव टवटवीत आणि टुणटुणीत असतात. गरीब मेलाय ना. मरू दे, इतका कुठे विचार करू, लोक सगळं विसरतात हा त्यांचा मंत्र असतो. त्यामुळे अपघात होऊ दे, आत्महत्या होऊ दे, आग लागू दे नाहीतर आणखी काही होऊ दे नेत्यांना काहीही फरक पडत नाही. सामान्य माणूस जगण्याच्या तणावात मरतो. हे नेते दिवसेंदिवस अधिकाधिक तरुण होत जातात.

याही वेळी नेत्यांनी तीच बाष्कळ बडबड केली. अजित पवार म्हणाले की, सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करू, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तत्काळ चौकशी करून कारवाई करा, चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, जयंत पाटील म्हणतात की, मन सुन्न झाले, अनिल देशमुख म्हणाले की, मी घटनास्थळी जाणार आणि सखोल चौकशी करणार आहे. दर दुर्घटनेवेळी हीच वाक्य फेकतात. मॉलला आग लागली की सर्व मॉल तपासणार, हॉस्पिटलला आग लागली की सर्व हॉस्पिटल तपासणार, असा पोरखेळ सुरू असतो. अंधेरीच्या कामगार रुग्णालयात आग लागून आठ ठार झाले तेव्हा याच घोषणा केल्या ना? त्यावेळी जिल्हा रुग्णालयांची स्थिती कळली नाही? तो गरीब तडफडत केईएम रुग्णालयात जातो तेव्हा ओपीडीच्या अतिदक्षता विभागाच्या खिडक्या उघड्या असतात. साधा एसी चालत नाही. तिथेच त्याला संसर्ग होऊन तो मरू शकतो. पम सुधारणा नाही करायची म्हणजे नाही करायची. नेत्यांना पैसे खायला मिळतात म्हणून फक्त ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय करण्याच्या फायली मंजूर करायच्या.

ज्या खाजगी रुग्णालयात पाय ठेवला की एक लाखाचे डिपॉझिट मागतात ती रुग्णालये वाढविण्यात या सर्वांना रस असतो. पण कोरोनात ही खाजगी रुग्णालये मदतीला धावली नाहीत. त्यांना कारवाईचे इशारे द्यावे लागले. कोरोनाच्या संकटात सरकारी रुग्णालये होती. तिथे आमच्या आया, बहिणी, भावांनी जीव तोडून काम केले म्हणून लाखो रुग्ण वाचले.
गरीबांची फक्त थट्टा करायची. प्रत्येक दुर्घटनेनंतर थट्टा करतात. मगरीचे अश्रू ढाळतात. नेते आणि टायवाले, सूटवाले खर्‍याच मगरी आहेत. मगर म्हणे भक्ष्य पकडते आणि भक्षाचे लचके तोडताना रडते म्हणून मगरीचे अश्रू हा वाक्यप्रयोग आला. हा वाक्यप्रयोग योग्यच आहे. परंतु सत्य असे आहे की. मगर अश्रूच ढाळत नाही. तिचे डोळे कोरडे झाले की ती डोळे ओले करण्यासाठी पाणी सोडते. भंडार्‍याच्या दुर्घटनेनंतर अशा सर्व पक्षाच्या मगरी आल्या आणि पाणी सोडून गेल्या.

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami