संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

Review : भळभळत्या जखमांची विदारक कहाणी ‘द काश्मीर फाईल्स’

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

‘काश्मीर’ हा एकंदरीतच देशाच्यादृष्टीने कायम अनुत्तरित राहिलेला आणि सतत अशांततेत होरपळत असलेला रक्तरंजित प्रश्न. सुमारे 32 वर्षांपूर्वी ‘इस्लामचा स्वीकार करा, काश्मीर सोडा किंवा मृत्यूला तयार व्हा’ असा नारा देत इस्लामी दहशतवाद्यांनी काश्मीरमधील हिंदूंवर हल्ला चढवला होता. या काळात काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरातून बाहेर काढून निर्दयपणे त्यांची हत्या करण्यात आली होती. स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले, लहान निष्पाप मुलांचेही या अतिरेक्यांनी बळी घेतले. सतत दहशतीखाली जगणाऱ्या काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार, या सर्व भळभळत्या आठवणींचे चित्रण, संघर्षातील इतिहास ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटाची कथा क्रिकेटच्या बहाण्याने मोठी गोष्ट बोलणाऱ्या एका क्षणापासून सुरू होते. एका लहान मुलावर एकाच कारणासाठी हल्ला होतो, ते कारण म्हणजे, हा मुलगा सचिन तेंडुलकरचा फॅन असतो आणि भारताचा जयजयकार करत असतो. खोऱ्यात जे घडले ते वेदनादायी आहे. त्याला पडद्यावर पाहणे क्लेशदायक आहे. हा दहशतवादाचा चेहरा इतका भयानक आहे की तो जगाला दाखवणे फार गरजेचे आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटातील प्रत्येक दृश्य तत्कालीन परिस्थितीची जाणीव करून देते. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार बघून मनाचा थरकाप उडवत हा चित्रपट तुमचा मेंदू आणि मन दोन्हीचा ताबा घेतो आणि तुम्ही चित्रपट संपल्यावरही कित्येक काळ त्यामधून बाहेर येऊ शकत नाही.

ज्ञानाची गंगोत्री असलेले, विद्येचे शक्तीपीठ असलेले ‘काश्मीर’ वामपंथी इकोसिस्टीमने पद्धतशीरपणे हिरवं रंगवून ते भारतापासून कसे तोडलेले राहील याची काळजी कशी घेतली गेली हे चित्रपट पाहताना जाणवतं. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट एक प्रकारे इतिहासाच्या त्या ‘फाईल्स’ उलटवण्याचा प्रयत्न आहे, ज्यामध्ये भारतातील भीषण हत्याकांडामुळे देशातून सर्वात मोठ्या पलायनाची कहाणी आहे. काश्मिरी पंडित हा बहुधा देशातील एकमेव असा समाज आहे की ज्यांना स्वातंत्र्यानंतर घरातून बेदखल करण्यात आले आहे आणि करोडो लोकसंख्या असलेल्या या देशातील कोणत्याही भागात कोणतीही हालचाल झालेली नाही. काश्मिरी पंडित, त्यांचे हत्याकांड, त्याबद्दल तत्कालीन सरकारची मूक भूमिका, कलम ३७० चे परिणाम आणि आज या पंडितांना दोषी ठरवून त्यांच्या हत्याकांडात सहभागी लोकांबद्दल सहानुभूती गोळा करणारे बुद्धिजीवी हे सर्व या चित्रपटात दाखवले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून विवेक अग्निहोत्रीने या चित्रपटात भावना पेरल्या आहेत. त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अभिनेते आणि तंत्रज्ञांनी चित्रपटात कौतुकास्पद काम केले आहे. पुष्करनाथ पंडित (अनुपम खेर), राधिका मेनन (पल्लवी जोशी), कृष्ण पंडित (दर्शन कुमार), फारुख मलिक बिट्टा (चिन्मय मांडलेकर), शारदा पंडित (भाषा सुम्बली), लक्ष्मी दत्त ( मृणाल कुलकर्णी), पोलीस अधिकारी (पुनीत इस्सर), मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सर्वच कलाकारांनी आपलं काम चोख बजावलं आहे. अनुपम खेर यांनी साकारलेला काश्मिरी पंडित जीव हेलावून टाकतो. त्याबरोबरच काश्मिर हा कशाप्रकारे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे हे सुद्धा हा चित्रपट पटवून देतो. या चित्रपटात प्रत्येक ठिकाणी काश्मिरी पंडितांवरील अत्याचार अंगावर काटा आणतात.

चित्रपटातील ‘जब तक सच जूते पहनता है, तब तक झूठ नंगे पाव गाव घूम आता है’ , फेक न्यूज दिखाना इतना खतरनाक नहीं है, जितना रियल न्यूज छुपाना’, ‘सपने पूरे नहीं होते, उनके पीछे भागना पडता हैं’ हे दृश्याना अनुसरून घेतलेले संवाद अतिशय बोलके आहेत. चित्रपटाची पटकथा दमदार असल्याने रसिकांना सुरुवातीपासून खिळवून ठेवते.

वास्तववादी चित्र उभं करण्याचा प्रयत्नात चित्रपट काहीसा संथ झाला आहे. मुळात भावनिक आणि सत्यघटनेवर आधारित चित्रपट बनवताना चित्रपटाचा वेग आणि लांबी यावर विशेष लक्ष देणं खूप महत्वाचं असतं. परंतु, ‘द काश्मीर फाईल्स’ इथे काहीसा कमी पडतोय. पूर्वार्धात काही काळ चित्रपट रटाळ वाटू शकतो, पण उत्तरार्धात मात्र चित्रपट पुन्हा आपल्या मनाची पकड घेतो. चित्रपट संपल्यावर बाहेर पडताना प्रेक्षक काहीही न बोलता हृदयातील सल चेहऱ्यावर घेऊन बाहेर पडतात यावरूनच चित्रपट किती वास्तववादी आहे हे समजते.

चित्रपटातील काही दृश्ये थरकाप उडवणारी आहेत. तांदूळ भरून ठेवलेल्या बॅरलमध्ये लपलेल्या टेलीकॉम इंजिनिअरला गोळ्या घालून त्याची केलेली हत्या, तांदुळाच्या डब्यात पसरलेला रक्ताचा सडा आणि त्याच्या पत्नीला जबरदस्तीने खायला लावलेले रक्ताने माखलेले तांदूळ, हे दृश्य डोकं सुन्न करतं.

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर तो समाजप्रबोधनाचा एक प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे निव्वळ मनोरंजन हा उद्देश घेऊन तुम्ही चित्रपट बघणार असाल तर, इथे तुमची घोर निराशा होऊ शकते. कारण हा चित्रपट तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. हा चित्रपट तुम्हाला त्या काळात घडलेल्या वास्तववादी परिस्थितीचे दर्शन घडवतो. या चित्रपटाची दाहकता आपल्याला पहावणार नाही, पण ज्यांनी ते भोगले त्यांच्या अत्याचारांसाठी सहानुभूती म्हणून आणि हे जळजळीत वास्तव समोर आणणाऱ्या चित्रपटाच्या टीमला पाठिंबा म्हणून तसेच इतिहास अनुभवायचा असेल, काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार समजून घ्यायची इच्छा असेल, तर हा एकदा हा चित्रपट पहायलाच हवा!

चित्रपट: ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files)
दिग्दर्शक: विवेक अग्निहोत्री.
कलाकार: अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सर आणि इतर.

दर्जा: ****

स्वप्नील कुलकर्णी

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami