मेष
तुमच्या मध्यस्थीने लोकांची कामे मार्गी लागतील. नातेवाईकांशी आर्थिक व्यवहारावरून मतभिन्नता निर्माण होईल. हक्काची व्यक्ती मनाप्रमाणे वागत नसल्याची खंत जाणवेल. घरातील नोकर, नातेवाईक यांच्या आतून एक, बाहेरून एक वागण्याचा त्रास होईल. संततीबाबतीत खर्च वाढीव राहील. नोकरदारांनी कोणावर अवलंबून न राहता योग्य वाटेल तो निर्णय घेऊन मोकळे व्हावे. व्यवसायात तात्पुरत्या प्रलोभनांपासून सावध असावे. जुन्या येण्याच्या बाबतीत प्रयत्न करत रहा. महिलांनी घेतलेले निर्णय योग्य व अनपेक्षित यश देणारे ठरतील. तरुणांनी यशस्वीतेसाठी स्वयंशिस्तीच्या मर्यादा पाळणे आवश्यक ठरेल. अकौंटिंग, बँकिंग, सहकार, विमा या क्षेत्रांना चांगला काळ. मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. अध्यात्मात समाधान देणार्या गोष्टी घडतील. हृदय, रक्तदाब या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये.
वृषभ
घरच्यांच्या आग्रहापुढे कितपत झुकायचे याचे भान ठेवा. पैशाची उपलब्धता राहील. जुनी येणी वसूल होतील. घरमालक भाडेकरू संबंध काही प्रमाणात ताण देतील. संततीबाबतीत योग्य अयोग्यतेचा विचार करून निर्णय घ्यावा. नोकरीत वरिष्ठांचे पाठबळ, परिस्थितीची अनुकूलता यामुळे हितशत्रूंवर मात करू शकाल. काही अडचणीच्या कामांची जबाबदारी मनात नसतानाही घ्यावी लागेल. व्यवसायात अपेक्षित लाभ संभवतात. व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. जुनी गुंतवणूक फायदा देईल. महिलांना अपेक्षापूर्तीचे योग. तरुणांनी मर्यादेचे भान ठेवून वागणे बोलणे ठेवावे. काहींना कमी श्रमात अधिक लाभ. खाद्यपदार्थ, प्रवाही पदार्थ, किराणा या क्षेत्रात काम करणार्यांना चांगला काळ. वैद्यकीय खर्चाबाबतीत टाळाटाळ अंगाशी येईल. प्रवास कार्यसाधक होतील. वाचन, श्रवण, मनन मनास समाधान देईल.
मिथुन
पैशाच्या उपलब्धतेमुळे अडलेले निर्णय घेऊ शकाल. स्वत:च्या अडचणीचा इतरांकडून फायदा घेतला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. नातेवाईक तुमच्या विरोधात गोष्टी करतील. संततीशी योग्य संवाद साधणे गरजेचे आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदे दृष्टिपथात येतील. नोकरीत जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडू शकाल. जुनी कार्यालयीन अडचणीची कामे मार्गी लागतील. महिलांनी योग्यता ओळखून वागणूक ठेवल्यास नातेवाईक अंतरावर रोखले जातील. तरुणांनी कोणाबरोबर तुलनात्मक दृष्टिकोन ठेवून स्वत:स कमी लेखू नये. विक्री, दुरुस्ती, घरगुती उपकरणे या क्षेत्रात काम करणार्यांना चांगला काळ. पचनाचे त्रास वाढणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आध्यात्मिक, धार्मिक चर्चा होतील.
कर्क
जोडीदाराशी अपेक्षित व योग्य संवाद साधला जाईल. खर्च गरजेपुरताच करावा. स्वजनांबाबतीत मन प्रसन्न करणार्या गोष्टी घडतील. भाऊबंदकीचे जुने वाद कटकटी वाढवतील. संततीस नातेवाईक, इतरेजनाकडून अडचणी वाढणार नाहीत, याची काळजी घ्यावी. नोकरीत अनपेक्षित संधी चालून येतील. उत्पन्नात भर टाकणारी परिस्थिती निर्माण होईल. सहकार्यांमध्ये तुमची पत वाढेल. व्यवसायात झटपट घेतलेले निर्णय अडचणी वाढवतील. वरिष्ठ, कनिष्ठांच्या सावधानतेच्या इशार्याकडे दुर्लक्ष करू नये. महिलांच्या चांगल्या गुणांची पारख इतरांकडून होईल. तरुणांचे अचानक उद्भवणार्या अडचणीमुळे फार बिघडणार नाही. स्वत:स चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करावा. देवदर्शनानिमित्त प्रवास घडेल. सत्संग लाभेल.
सिंह
निकटवर्तीयांबरोबर बर्याच काळापासून सुरू असलेल्या कुरबुरी संपुष्टात येतील. कौटुंबिक सुखात भर टाकणारी बातमी समजेल. भावंडांशी तात्त्विक मतभेद टाळावेत. संतती तुमचे म्हणणे ऐकेल. नोकरीत विशिष्ट हेतू मनात धरून सहकारी सहकार्य करतील. व्यवसायात घेतलेल्या निर्णयाबाबत कितीही धाकधूक राहिली तरी चांगला पैसा मिळेल. शासनाची कायद्यासंबंधीची, हिशोबासंबंधीची कामे मार्गी लागतील. महिलांना या काळात काही सकारात्मक बदल समोर येतील. तरुणांनी फाजील आत्मविश्वास बाळगू नये. कला, क्रीडा, संगीत, प्रसिद्धी या क्षेत्रात काम करणार्यांना चांगला काळ. मधुमेहींनी पथ्यपाणी सांभाळावे. आध्यात्मिक वाचन, चर्चा, श्रवण यातून विचारांना योग्य दिशा मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील.
कन्या
कौटुंबिक सुखात भर टाकणारी खरेदी कराल. बरेच दिवस रेंगाळत असलेली खरेदी, महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. आश्वासन देण्याघेण्यात अडकले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. संततीकडून अपेक्षा पूर्ण होतील. नोकरीत जबाबदारीतील चालढकल ऐनवेळेस अडचणी वाढवेल. सहकार्यांची वैयक्तिक कामे करावी लागतील. व्यवसायात अचानक येणार्या तणावामुळे अजून अडचणीत भर पडणार नाही, हे पाहावे. आर्थिक बाजू भक्कम राहील. जुनी येणी वसूल होतील. महिलां घरच्यांसाठी मनाजोगता खर्च करू शकतील. तरुणांनी स्वत:चे काम चोख ठेवल्यास ऐनवेळचा ताण जाईल. उपासनेत नियमितता टिकवून ठेवणे आवश्यक ठरेल. आवडते पदार्थ कमी खावेत. प्रवास कार्यसाधक.
तूळ
घरच्या वादात शब्दाला शब्द वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. कौटुंबिक खर्चास आळा घालण्याचे प्रयत्न यश देणार नाहीत. घरच्यांच्या, ज्येष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. काहींना कमी श्रमात अधिक लाभ. संततीस त्यांच्या क्षमतेची जाण करून देणे आवश्यक ठरेल. नोकरीत इतरांच्या वागण्याने त्रस्त व्हाल. व्यवसायात पूर्ण खात्री पटल्याशिवाय व्यवहार करू नये. शासकीय नियमांच्या अडचणीतून सुटल्याचे समाधान मिळेल. महिलांनी घेतलेले निर्णय अपेक्षेपेक्षा अधिक यश देतील. तरुणांनी आळस झटकणे आवश्यक आहे. घरगुती उपकरणे, फर्निचर, क्रॉकरी या क्षेत्रात काम करणार्यांना चांगला काळ. कुटुंबियांबरोबर करमणूक, स्नेहभोजनाचा आनंद घ्याल. आरोग्याच्या दृष्टीने स्वयंशिस्त पाळणे. वाहने चालवताना योग्य काळजी घ्यावी. सत्संग लाभेल.
वृश्चिक
निर्णय घेताना साप मरेल, पण काठी तुटणार नाही, याचे भान ठेवावे. जोडीदाराच्या चुका काढणे टाळावे. घरात एकंदरीत उत्साहाचे वातावरण राहील. भावाबहिणींकडून सहकार्य मिळेल. नोकरीत चुगलखोर व राजकारणी व्यक्तींपासून सावध असावे. व्यवसायात यश प्राप्त होईल. प्रतिस्पर्ध्यांच्या कारवाया हाणून पाडाल. तात्पुरती देणी देऊ शकाल. महिलांना आवडत्या व्यक्तीचा सहवास मिळेल. तरुणांना कमी श्रमात अधिक लाभ संभवतात. आध्यात्मिक संस्था, पूजा साहित्य, देवकार्य या क्षेत्रात चांगला काळ. दात व केसासंबंधी आरोग्य जपावे. वाचन, श्रवण, मननामुळे मनास समाधान लाभेल. संसर्गजन्य रोगांपासून सावध असावे. प्रवासात चीजवस्तू सांभाळून असावे.
धनु
अपेक्षेनुसार गोष्टी घडतील. कौटुंबिक स्तरावर तुमची मध्यस्थी फायद्याची ठरेल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. संततीच्या हट्टीपणाचा प्रसंगी त्रास होऊ शकतो. नोकरीत जास्त कोणावर अवलंबून राहणे टाळावे. जुनी साचून राहिलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन बोलणी, जोडधंदा, कर्ज यासंदर्भातील प्रयत्न यश देतील. नोकरवर्गाकडून त्रास होणार नाही. महिलांनी बचतीच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरुणांनी कृतीने उत्तर देणे फायद्याचे राहील. वैद्यकीय, औषधी निर्मिती, रुग्णालये, आरोग्य या क्षेत्रात काम करणार्यांना चांगला काळ. जत्रा, ऊरूस, यात्रा यामध्ये भाग घ्याल. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. नाक, कान, घशाचे आरोग्य जपावे.
मकर
कौटुंबिक स्तरावर होणारे वादविवाद टाळावेत. जुन्या-नव्या पिढीच्या आग्रही वागण्याकडे प्रसंगी दुर्लक्ष करणे फायद्याचे ठरेल. नात्यातील अडलेले व्यवहार मार्गी लागतील. संततीसंदर्भात झटपट निर्णय नको. नोकरीत वरिष्ठांवर अवलंबून राहू नका, आपण भले आपले काम भले या न्यायाने वागा. व्यवसायात हितशत्रू, स्पर्धक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. नवीन कामे, बँक, कर्ज, शासकीय अडचणी यासाठीच्या प्रयत्नांना यश मिळेल. महिलांना कमी खर्चात उत्तम खरेदी केल्याचा आनंद मिळेल. तरुणांनी कुठलीही गोष्ट विकोपाला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. कायदा, वकिली या क्षेत्रात चांगला काळ. उष्णता वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रवासात आरोग्य जपणे गरजेचे.
कुंभ
जोडीदाराचे समाधान करताना तारेवरची कसरत करावी लागेल. कौटुंबिक प्रश्नाचे स्थितप्रज्ञतेने उत्तर शोधा. काहींना कमी श्रमात अधिक लाभ. संततीच्या सर्वच मागण्या मान्य करणे योग्य ठरणार नाही. नोकरीत बदली, बढती, पगारवाढ याबाबतीत राजकारणास सामोरे जावे लागेल. वरिष्ठ आश्वासन देण्यापुरतेच उपयोगी ठरतील. व्यवसायात काहींना कमी श्रमात अधिक लाभ संभवतो. भागीदारीच्या कटकटीस सामोरे जावे लागले, तरी अडचणीचे प्रश्न मार्गी लागतील. महिलांना ध्यानीमनी नसता काही लाभ संभवतात. तरुणांनी कोणावर अवलंबून राहाणे टाळावे. संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, औद्योगिक क्षेत्रात काम करणार्यांना चांगला काळ. धार्मिक कार्य घडेल. वाहने जपून चालवात. मधुमेहींनी पथ्यपाणी सांभाळावे.
मीन
नातेवाईकांची जबाबदारी अंगावर पडेल. झटपट आश्वासने देणे टाळावे. घरात लहान मुलांचे प्रश्न दुर्लक्षित होणार नाहीत, हे पाहावे. गोष्टी परस्पर निभावल्या गेल्याचे समाधान मिळेल. संततीची करिअरमध्ये उत्तम प्रगती होईल. नोकरीत गोष्टी पटवून देण्यापेक्षा थोडे मुत्सद्दीपणाने वागणे आवश्यक ठरेल. कोणाबरोबर गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. व्यवसायात अपेक्षेपेक्षा उलाढाल होऊन फायदा संभवतो. गुंतवणूकीचे निर्णय योग्य ठरतील. महिलांनी कृतीनेच उत्तर देणे गरजेचे ठरेल. तरुणांच्या बाबत अडचणीच्या कामाचा तणाव राहील. सोने, चांदी, सराफी, कारागिरी या क्षेत्रांना चांगला काळ. साधना, जप, अनुष्ठानामुळे मानसिक संतुलन राहण्यास मदत होईल. मूत्रविकारांपासून सावध असावे.
– संजय मनोहर