तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा किंवा एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या बँकांनी काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत, ते आपण जाणून घेऊया.
बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याजदर देते. आता ही बँक फिक्स्ड डिपॉझिटवर (FD) व्याजदर वाढवणार आहे. 25 फेब्रुवारीपासून मुदत ठेवींवरच्या व्याजदरात बदल केला आहे. बँक ऑफ बडोदा सध्या 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 2.80 टक्के व्याज देते. आता बँकेने केलेल्या बदलानंतर 46 ते 180 दिवसांच्या मॅच्युरिटीवर 3.7 टक्के आणि 181 ते 270 दिवसांच्या मॅच्युरिटीवर 4.30 टक्के व्याज मिळणार आहे. तसेच बँक 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.4 टक्के व्याज देणार आहे. तर एका वर्षात मॅच्युअर होणाऱ्या FD वर 5 टक्के व्याजदर आहे. 1 वर्षापेक्षा जास्त आणि तीन वर्षांपर्यंतच्या FD वर 5.1 टक्के व्याजदर आहे. तसेच 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत असलेल्या FD वर 5.25 टक्के व्याज आहे.
त्याचबरोबर एचडीएफसी बँक आणि एसबीआयने एफडीवरच्या व्याजदरात बदल केले होते. याचा थेट फायदा नव्याने एफडी करणाऱ्या ग्राहकांना होत आहे. एसबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 7 दिवस ते 45 दिवसांसाठी 3.30 टक्के व्याज देण्यात येत आहे. 46 ते 179 दिवसांदरम्यानच्या एफडीसाठी 3.90 टक्के दराने व्याज मिळेल. 180 ते 210 दिवसांसाठी नागरिकांना 4.40 टक्के, तर 211 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 4.40 टक्के व्याज मिळेल. 1 वर्षापेक्षा जास्त ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.10 टक्के दराने बँक व्याज देईल. 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एफडी केल्यास बँक 5.20 टक्के दराने व्याज देईल. 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एफडी केलं, तर त्यावर तुम्हाला बँकेकडून 5.45 टक्के दराने व्याज मिळेल. तसंच 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंतच्या दीर्घ काळासाठी बँकेत पैसे ठेवल्यास त्यावर तुम्हाला 5.50 टक्के व्याज मिळेल. त्यामुळे ग्राहकांना जास्त नफा मिळणार आहे.