मुंबई – शिवसेना नेते आणि मुंबई पालिकेचे २०१८ पासून स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दोन घरांवर आज सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. माझगावच्या बिलखादी चेंबर व कॉपर कॅसेल येथील घरावर छापा टाकला. त्यानंतर माझगाव विभागाचे शिवसेना संघटक विजय लिपारे यांच्यासह तीन कंत्राटदारांच्या घरांवरही आयकर खात्याचे अधिकारी पोहोचले. या कारवाईत केंद्रीय तपास यंत्रणेच्या पाच पथकांनी मुंबईत विविध ठिकाणी छापे मारले असून त्यामध्ये महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तपास सुरु असताना इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. यशवंत जाधव यांच्या दोन्ही घराबाहेर केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.
यशवंत जाधव हे मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने आर्थिक निर्णयांमध्ये यशवंत जाधव यांचा सहभाग असतो. पालिकेच्या कंत्राट आणि अन्य व्यवहारांमध्येही स्थायी समितिची महत्वाची भूमिका असते.भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप जानेवारीत केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. सोमय्या यांनी आरोप केला होता की, जाधवांनी अरब अमिरातीत १५ कोटी रुपये पाठवले. कोलकत्ता येथील बेनामी कंपन्यांद्वारे हे व्यवहार झाले. सईद डोन सारजा, सीनजीर्त व्हेंचर्स या दुबईतील दोन कंपन्यांमध्ये पैसे जाधव यांनी गुंतवले. आणि प्रधान डीलर या कंपनीकडून १ कोटी रुपये घेतल्याचे दाखवले, पण ही कंपनी बनावट आहे. हा पैसा यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांचाच असल्याचा आरोप आहे. यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला की, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या विरोधात ६ जानेवारीला आयकर विभाग व कंपनी विभाग सगळीकडे तक्रारी केल्या असून गेला महिनाभर त्याचा तपास सुरु आहे. यामिनी जाधव यांनी २०१९ मध्ये आमदारकीचा अर्ज भरला तेव्हा त्यात त्यांनी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता लपवली. त्याची माहिती आयकर विभागाला कळली. प्रधान डीलर्स प्रा. लि.ही बनावत कंपनी आहे. जी बंद घोषित केली. पालिका कंत्राटदाराकडून जे रोकड पैसे येतात ते हवाला ऑपरेटर उदय शंकर महावार मार्फत फिरवले जातात. उदय शंकर महावार हा गांधी परिवाराचाही हवाला ऑपरेटर आहे. जाधव यांनी हवाला ऑपरेटरकडे १५ कोटी रुपये रोख देऊन चेक घेतला. यशवंत जाधव, त्यांची पत्नी यामिनी जाधव, त्यांची दोन मुले यांच्याकडे कंत्राटदारांचा पैसा जायचे. त्यातील काही पैसे अरब अमिरातीत पाठवला गेला.
आयकर विभागाच्या आजच्या करवाईवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली की, आता पालिकेच्या शिपायाच्या घरीही धाडी टाकल्या जातील. तर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, यशवंत जाधव यांच्या घराबाहेर कंत्राटदारांची रांग असते. दरम्यान, यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकल्याचं कळताच महापौर किशोरी पेडणेकर या घटनास्थळावर पोहोचल्या. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, हे सर्व सुडबुद्धीने केलं जात आहे. करु दे… जे सत्य आहे ते लोकांच्या समोर येईल. तपास यंत्रणेला त्रास द्यायचं नसतं. त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करु नये. त्यांच काम त्यांना करु दे. मुंबई पोलिसांनाही त्रास देऊ नये. त्यामुळे शिवसैनिकांनी शांत रहावे आणि तपास यंत्रणेला काम करु द्या, हेच सांगण्यासाठी मी इथे आली आहे. आपण छगन भुजबळ यांना पहिले आहे. त्यांना त्रास भोगावा लागला. हा मनस्ताप आम्ही भोगू. भुजबळ निवडून आले मंत्री झाले. कोर्टाने क्लिनचीट दिली असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर शिवसेना नेत्यावर आयकर खात्याच्या धाडीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.