ठाणे – मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे ते डोंबिवली दरम्यान प्रवास करण्याऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. मेगा ब्लॉक मुळे 350 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तर 100 हून अधिक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच कामाला सुरुवात झाली आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकावर सकाळपासून प्रचंड गर्दी झाली आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये तुफान गर्दी झाली आहे.
ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान सहाव्या आणि पाचव्या मार्गीकेचे काम करण्यासाठी या जम्बो मेगा ब्लॉक दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलसह अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. याबरोबरच डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.
दिवा-वसई मेमु ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या पनवेल स्थानकात थांबवण्यात येणार आहेत. तर सर्व फास्ट लोकल (जलद गाड्या) गाड्या स्लो (धिम्या मार्गावर) ट्रॅकवर वळवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी आतापर्यंत अनेक मोठे जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. मात्र यातील सर्वात मोठा ब्लॉक 4, 5, आणि 6 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकनंतर पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यन्वित होईल, असं एमआरव्हीसीनं सांगितलं आहे.
ठाणे आणि मुंब्रा या स्थानकांच्या दरम्यान 205 विशेष बस सेवा चालवणार
ठाणे महानगरपालिका ठाणे आणि मुंब्रा या स्थानकांच्या दरम्यान 205 विशेष बस सेवा चालवणार आहे. त्यामुळे या शनिवारी, रविवारी आणि सोमवारी मध्य रेल्वेने प्रवास करताना थोडे नियोजन करून घराबाहेर पडावे लागणार आहे.