नवी दिल्ली – एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर मेरठजवळील टोल प्लाझावर गोळीबार करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विटरवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, लेडी डॉनच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे.
दरम्यान, ट्विटरवर लेडी डॉन नामक अकाउंटवर ही धमकी देण्यात आली आहे. संबंधित ट्विट व्हायरल होताच पोलीस प्रशासनाने संबंधित अकाउंटविरोधात हापूर जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ट्विटर अकाउंट सध्या सस्पेंड करण्यात आले असून पुढील कारवाई केली जात आहे. लेडी डॉन नावाचे ट्विटर हॅंडल नेमके कोणाचे आहे? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला जात आहे. या ट्विटमध्ये, ‘ओवैसी तर एक मोहरा आहे. खरं टार्गेट योगी आदित्यनाथ आहेत. सर्व भाजप नेत्यांच्या वाहनांवर आरडीएक्सने हल्ला केला जाणार आहे. अज्ञात आरोपीनं संबंधित ट्विटमध्ये यूपी पोलिसांना देखील टॅग केले असून तुमची टीम तयार ठेवा, असा सल्ला दिला आहे. तुम्ही दिल्लीकडे फारसं लक्ष देऊ नका, अन्यथा इकडे योगी मारला जाईल.’ अशी खुलेआम धमकी लेडी डॉन नावाच्या ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली आहे.
तसेच मेरठच्या रहिवासी असलेल्या उत्तर प्रदेश अध्यक्ष सीमा सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांच्या हत्येचा पवित्रा घेतल्याचा दावाही यात करण्यात आला आहे. या खळबळजनक ट्विटची दखल हापूर पोलिसांनी घेतली असून तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी हापूर पोलिसांनी ट्विटर हॅंडलविरोधात गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडे सोपवला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.