मुंबई – जगविख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीत क्षेत्रातलं एक महत्त्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि लतादीदी अनंतात विलीन झाल्या. शिवाजी पार्क परिसरात लतादीदी यांना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाल्याचे समजताच अनेक मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शVासाठी गर्दी केली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा आज मुंबईत दाखल झाले. त्यांनी मंगेशकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी धीर दिला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, आमिर खान या सिनेसृष्टीतील दिग्गजांसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.
लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती ८ जानेवारी रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 9 जानेवारी रोजी रात्री त्यांच्या घराजवळील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र अचानक त्यांची प्रकृती बिघडली. गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आज दुर्दैवाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून 20हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला.