मुंबई – पोलिस प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल करण्याच्या हालचाली महाविकास आघाडी सरकारने सुरू केल्या आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती झाल्यानंतर मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय पांडे यांची वर्णी लागली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील काही नेते नाराज होते. त्यामुळे त्यांची साईड पोस्टिंगवर म्हणजे सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काळात होत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मनातील पोलिस आयुक्त मुंबईत आल्याची चर्चा खात्यात रंगली आहे.
संजय पांडे यांच्याकडे पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. तेथे गेल्या आठवड्यात रजनीश शेठ यांना नेमण्यात आले. पांडे यांच्या नावाला लोकसेवा आयोगाकडून हिरवा कंदिल न मिळाल्याने त्यांना पोलिस महासंचालकपदी कायम ठेवता आले नाही. आता मात्र मुंबईसारखे महत्वाचे पद देऊन महाविकास आघाडी सरकारने त्यांच्यावरील लोभ कायम ठेवला आहे.
संजय पांडे यांनी आपल्या महासंचालकपदाच्या हंगामी काळात पोलिस कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांच्याविषयी कर्मचाऱ्यांत आपुलकीची भावना होती. मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर तेथे नगराळे यांना गेल्या वर्षी आणण्यात आले होते. त्यांना तेथे आपला कालावधी पूर्ण करता आला नाही.